मुंबई : किंगफिशर कंपनीचे मालक आणि वादग्रस्त उद्योजक विजय मल्ल्या हे भारताबाहेर निघून गेल्याचं बुधवारी स्पष्ट झालं. सरकारी तसंच खासगी बँकांचं मल्ल्यांनी सुमारे नऊ हजार कोटी रूपयांचं कर्ज थकवलंय. यावरून माल्यांच्या नावानं बोंबा ठोकणाऱ्या बँकांना न्यायालयानं चांगलंच खडसावलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'किंग ऑफ गुड टाइम्स' अशी शेखी मिरवणारे किंगफिशर कंपनीचे मालक विजय मल्ल्या आता 'किंग ऑफ बॅड टाइम्स' बनलेत. एकेकाळी ऐषोआरामी लाइफ जगणारा हा अब्जाधीश उद्योजक... आता त्यांचंच साम्राज्य लयाला जातंय. स्टेट बँक ऑफ इंडियासह तब्बल १३ बँकांचं सुमारे नऊ हजार कोटी रूपयांचं कर्ज त्यांनी थकवलंय. माल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करावा आणि खटल्याच्या सुनावणीच्या वेळी त्यांनी कोर्टात हजर राहावं, अशी मागणी करणारी याचिका सर्व बँकांनी सुप्रीम कोर्टात केलीय. मात्र बँकांना खूपच उशीर झालाय.


'माल्या भारतात नाहीच'


कारण माल्ल्या गेल्या २ मार्च रोजीच भारताबाहेर गेलेत, अशी माहिती अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात दिली. माल्ल्या यांनी विविध बँकांचे नऊ हजार कोटी रूपयांचं कर्ज थकवलंय. मात्र जगभरात त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची किंमत कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे, असंही अॅटर्नी जनरलनी कोर्टात सांगितलं.


कोर्टानं बँकांनाच खडसावलं... 


दरम्यान, सुप्रीम कोर्टानं या सुनावणीच्या वेळी बँकांनाही चांगलंच खडसावलं. करोडो रूपयांची थकबाकी असताना विजय मल्ल्यांना बँकांनी नवीन कर्ज कसं दिलं? तारण मालमत्तेच्या दसपटीनं अधिक कर्ज मल्ल्यांना कसं देण्यात आलं? असा सवाल कोर्टानं केला. पासपोर्ट जप्ती प्रकरणी मल्ल्यांनी दोन आठवड्यात उत्तर द्यावं, अशी नोटीस सुप्रीम कोर्टानं आता बजावलीय. याप्रकरणी येत्या ३० मार्चला आता पुढील सुनावणी होणार आहे.


'किंग ऑफ बॅड टाइम्स'


१९८३ मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी विजय मल्ल्या यूबी ग्रुपचे चेअरमन झाले. १९९९ मध्ये त्यांनी किंगफिशर स्ट्राँग बिअरचा ब्रँड बाजारात आणला. तो आजही चांगलाच खपतोय. त्यानंतर राज्यसभा खासदार, किंगफिशर एअरलाइन्स, शॉ वॅलेस कंपनीची खरेदी, फॉर्म्युला वन टीमची खरेदी, आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचे मालक अशी एकाहून एक मोठी उड्डाणं मल्ल्यांनी घेतली. सुंदर ललनांची किंगफिशर कॅलेंडर पाहणारांचे डोळे दिपून जायचे. मात्र मदिरा आणि मदिराक्षींच्या जीवावर मल्ल्यांनी उभं केलेलं साम्राज्य लयास जाताना पाहण्याची वेळ नियतीनं त्यांच्यावर आणली.