मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री दादर येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ८४ व्या वर्षांच्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी रविंद्र नाट्यमंदिरात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. सायंकाळी दादर चौपाटी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.


किशोरीतार्इंचा जन्म मुंबई येथे १० एप्रिल १९३२ मध्ये झाला. आई, प्रख्यात गायिका मोगूबाई कोर्डीकर यांच्यामुळे घरातच त्यांना गायनकलेचा समृद्ध वारसा मिळाला होता. वडील माधवदास भाटिया यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले.


ख्याल गायकी बरोबरच ठुमरी, भजन गायनात किशोरीतार्इंनी भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या शैलीची मुद्रा उमटवली. मुंबईच्या एलिफिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. इ.स. १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. किशोरीतार्इंना दोन मुले आहेत. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या.


किशोरीताईंना मिळालेले पुरस्कार...


- संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८५)


- पद्मभूषण पुरस्कार(१९८७)


- संगीत सम्राज्ञी पुरस्कार (१९९७)


- पद्मविभूषण पुरस्कार (२००२)


- संगीत संशोधन अकादमी पुरस्कार (२००२)


- संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२००९)


किशोरीताई यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'पद्मभूषण' १९८७ व २००२ मध्ये 'पद्यविभूषण' या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. कला क्षेत्रातील मानाचा 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार'ही त्यांना मिळाला होता. 


१९५० च्या दरम्यान किशोरीतार्इंनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. १९९१ मध्ये 'दृष्टी' या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या, सराव तसंच अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीतार्इंचे गाणे कसदार झालं. त्यांनी देशोदेशी संगीत कार्यक्रम केले. अगदी आत्ता-आत्तापर्यंत त्या गात होत्या.


...आणि ते वचन अपूर्णच राहिलं!


काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या कमानी ऑडिटोरीयममध्ये त्यांनी विलक्षण मैफील सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केलं. मैफील झाल्यावर रसींच्या टाळ्यांचा कडकडाट थांबेना तेव्हा त्यांनी पुढे येवून रसिकांना अभिवादन केलं आणि 'मला बोलवा मी पुन्हा येईन' असं वचन दिलं. 


त्या शेवटपर्यंत संगितात रममाण होत्या. त्यांनी 'स्वरार्थरमणी-रागरससिद्धान्त' हा संगीत शास्त्रावरील ग्रंथ लिहिला. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते. एका युगाचा अस्त त्यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असे सर्रास वापरले जाणारे शब्द आज या निधनाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडताहेत.