वीरांचा गौरव करणारी एक आगळीवेगळी मालिका येत्या महाराष्ट्र दिनी झी मराठीवर


 
मुंबई : महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची भूमी.... देशासाठी प्राणपणाने लढणारे वीर या महाराष्ट्रात जन्मतात…. शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात असं न म्हणता माझ्या घरात निदान एक तरी शिवाजी जन्मावा असं मानणारी एक पिढी नाही तर पिढ्यानपिढ्या... आणि एक घर नाही तर संपूर्ण गावच्या गाव अस तं ते महाराष्ट्रातच!!! महाराष्ट्राच्या शूरवीरांना मानवंदना देणारी, त्या वीरांचा गौरव करणारी ‘लागिरं झालं जी’ ही एक आगळीवेगळी मालिका येत्या महाराष्ट्र दिनी झी मराठीवर सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता अवतरत आहे. वेगळे विषय आणि नाविन्यपूर्ण कथा याबरोबरच जिवंत सादरीकरण या नेहमीच झी मराठीच्या जमेच्या बाजू राहिल्या आहेत. याच परंपरेत आता एक नवा अध्याय लिहिला जात आहे तो “लागिरं झालं जी” या मालिकेचा!!!
 
सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख म्हणजे सैनिकांचा जिल्हा. साताऱ्यातल्या बहुतांश घरातून एखादा मुलगा तरी सैन्यात असतोच. अशा या साताऱ्या जिल्ह्यातल्या चांदवडी गावातला एक मुलगा म्हणजे अजिंक्य शिंदे. अजिंक्यचे आई वडिल तो लहान असतानाच गेले. त्यामुळे अजिंक्य त्याच्या मामा – मामी आणि जिजी (आजी)सोबत त्यांच्याच घरी लहानाचा मोठा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अजिंक्यचं एकमेव स्वप्न म्हणजे त्याला सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची आहे. पण अजिंक्यच्या या स्वप्नाला घरच्यांचा विरोध आहे. या विरोधाचं कारण म्हणजे मामा मामीला एकुलती एक मुलगी आहे जयश्री आणि मामीची इच्छा आहे की जयश्रीचं लग्न अजिंक्यशी व्हावं जेणेकरुन एकुलती एक मुलगी डोळ्यांसमोर राहिल आणि अजिंक्यच्या रुपात म्हातारपणाची काठी मिळेल. 
 
 अनेकदा समजावूनही अजिंक्य त्याच्या स्वप्नाशी तडजोड करायला तयार नाही. सैन्यात जायचं लागिरं झालेल्या अजिंक्यच्या अगदी उलट स्वभावाची आहे शीतल. जिच्या आयुष्यात कुठलंही ध्येय नाही. आला दिवस निवांत आणि हसत खेळत जगणारी पवार कुटुंबातली लाडकी मुलगी. पवारांच्या घरात गेल्या अनेक पिढ्यांत मुलीचा जन्म झाला नाहीये. त्यामुळे शीतल ही सर्वांची लाडकी आहे. शीतलचे दोन्ही काका आणि काकी यांचाही शीतलवर फार जीव आहे.


 



 सर्व भावंडात एकुलती एक मुलगी असल्याने शीतलचे घरात खूप लाड होतात. तिला एकही काम करायला लावलं जात नाही. शीतल लकी असल्याची सर्वांची समजूत आहे. लग्न झालं तरी शीतलने आपल्या जवळपास याच गावात असावं अशी सर्वांची इच्छा आहे. शीतल अतिशय सुंदर आहे. पण जी जितकी सुंदर आहे, जीभ तितकीच तिखट. गावातली सगळी मुलं शीतलच्या मागे पुढे फिरतात पण अजिंक्य आणि शीतलचं मात्र अजिबात पटत नाही. सतत एकमेकांना त्रास देणारे आणि भांडणारे अजिंक्य आणि शीतल हळूहळू प्रेमात पडतात. अजिंक्य त्याच्या देशावरच्या प्रेमासाठी जीव ओवाळून टाकतोय तर शीतल त्याच्यावरच्या प्रेमापोटी...देशसेवेचं लागिरं झालेल्या अजिंक्य आणि त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या शीतलची ही आगळीवेगळी, झपाटून टाकणारी प्रेमकहाणी...लागिरं झालं जी..!!!


 
लागिरं झालं जी...मध्ये अजिंक्यच्या भूमिकेत नितीश चव्हाण आणि शीतलच्या भूमिकेत शिवानी बोरकर हे नवे ताज्या दमाचे कलाकार असणार आहेत.   
श्वेता शिंदे आणि संजय कांबळे यांच्या वज्रा प्रॉडकशन्स निर्मित या मालिकेचे दिग्दर्शन संजय कांबळे यांनीच केले आहे. तेजपाल वाघ याने ही मालिका लिहिली असून पूर्ण मालिका साताऱ्यात चित्रित करण्यात येणार आहे तर या मालिकेत बहुतेक सर्व कलाकार याच भागातले स्थानिक कलाकार आहेत. 



येत्या सोमवार पासून सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता प्रेमाचं, देशप्रेमाचं हे लागिरं अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.