महाजनी कुटुंबावर एकेकाळी आली होती कर्जबाजारी होण्याची वेळ, पण...
अभिनेता गश्मीर महाजनी सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या डबिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सध्या त्याची आई पुण्यात आणि तो मुंबईत असे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत... पण यंदाच्या `मदर्स डे` (14 मे) ला आईसोबत अख्खा दिवस घालवण्यासाठी गश्मीरने एक दिवस सुट्टी घेतली आहे.
मुंबई : अभिनेता गश्मीर महाजनी सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या डबिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सध्या त्याची आई पुण्यात आणि तो मुंबईत असे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत... पण यंदाच्या 'मदर्स डे' (14 मे) ला आईसोबत अख्खा दिवस घालवण्यासाठी गश्मीरने एक दिवस सुट्टी घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गश्मीरची आई ह्या आठवड्याअखेरीस मुंबईत येतेय आणि गश्मीरने आपल्या निर्मात्याला सांगून अगोदरच सुट्टी घेतलीय. हा संपूर्ण दिवस आईसोबतच घालवणार आहे. गश्मीरने आईसोबत सिनेमा पाहायला जायचाही प्लॅन बनवलाय.
मदर्स डेच्या निमित्ताने गश्मीरला त्याच्या आईविषयी विचारल्यावर तो म्हणतो, 'मी माझ्या आईला बिजनेसवुमन मानतो. कारण तिने गश्मीर महाजनी हे प्रॉडक्ट निर्माण केलंय. आज मी जे काही आहे, ते फक्त माझ्या आईमुळेच'
तो लहानपणीची आठवण सांगतो, 'मी जेव्हा 15 वर्षांचा होता. त्यावेळी आम्ही कर्जबाजारी झालो होतो... आणि कर्जाचे हफ्ते वेळेत न भरल्याने बॅंकेने घर जप्त केले होते. त्यावेळी आईच्या पाठिंब्यामुळे मी डान्स अकॅडमी आणि माझी स्वत:ची इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली'
तो पुढे म्हणतो, 'स्वत:ची कंपनी सुरू करताना स्वत:च रस्त्यावर उभं राहून पत्रक वाटण्यापर्यंत हरत-हेची कामं मी केली आहेत... आणि त्यासाठी मला प्रेरणा माझ्या आईकडून मिळाली. कारण कर्जबाजारी असण्याच्या काळात माझी आई एका हॉटेलमध्ये तीन हजार रूपये महिन्याच्या पगारावर हाऊसकिपरचं काम करत होती. रात्री उशीरा बारा-साडेबारा वाजताच्या सुमारास मी आणि आईने रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतींवर ती पत्रकं चिकटवलेली, मी विसरू शकत नाही. त्यामुळे आईकडनंच मला उपदेश मिळाला की, कोणतंही काम छोटं नसतं. आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीच आपल्याला पुढे घेऊन जाते'
आईला काही गिफ्ट घेतलंय का? असं विचारल्यावर तो म्हणाला, 'आईला बऱ्याच दिवसांपासून अमेरिकेला जायची इच्छा होती... मी गेल्या काही वर्षापासून त्यासाठी पैसे जमवतं होतो... आणि शेवटी 2016 ला मी तिला अमेरिकेला घेऊन गेलो होतो. तिच्याकडे सोन्याच्या बांगड्या नव्हत्या. तर तिच्या यंदाच्या वाढदिवसाला मी नुकत्याच तिच्यासाठी सोन्याच्या बांगड्या केल्या. आता मदर्स डेला जर तिला शॉपिंग करायची असेल, तर अर्थातच मी तयार आहे...'