पीएमटीमध्ये १२०० बसचा ताफ होणार दाखल!
वाहतुकीच्या समस्येने त्रस्त झालेल्या पुणेकरांसाठी एक गुडन्यूज...
नितीन पाटणकर, पुणे : वाहतुकीच्या समस्येने त्रस्त झालेल्या पुणेकरांसाठी एक गुडन्यूज...
पुण्यातली एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीच्या ताफ्यात लवकरच नव्या १२०० बसेसची भर पडणार आहे. शहर वाहतुकीसाठी पुरेशा बसेस उपलब्ध होणार असल्याने पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.
पीएमपी म्हटली की 'नको रे बाबा' हा पुणेकरांचा सर्वसाधारण अनुभव… सुस्थितीतील बसेसची कमतरता हे त्यामागचं मूळ कारण आहे. अर्थात त्याविषयीची नुसती चर्चा गेली अनेक वर्षे सुरु आहे. मात्र आता पीएमपी च्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलाय. त्यानुसार पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिका ७०० नवीन बसेसची खरेदी करणार आहे. त्याशिवाय आणखी ५०० बसेस भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिलीय.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या १५०० बसेस आहेत. त्यापैकी ४०० ते ५०० बसेस नेहमीसाठी नादुरुस्त असतात. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची संख्या हजाराच्या आसपास आहे. नवीन बसेसच्या खरेदीमुळे ताफ्यातील बसेसची संख्या २७०० वर जाणार आहे. त्यातील नादुरुस्त बसेसची संख्या कमी केल्यास ही बस खरेदी दिलासादायक ठरणार आहे.
पुणे शहराची लोकसंख्या लक्षात घेता शहरात किमान ३००० बसेसची आवश्यकता आहे. मात्र सध्या जे पदरात पडू घातलंय तेही नसे थोडके म्हणावं लागेल. पुढील ४ महिन्यात नवीन बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील असं सांगण्यात येतय. त्यात कुठली आडकाठी येऊ नये म्हणजे झालं. गेल्या वेळी बसचा दरवाजा कुठल्या बाजूने हवा या वादापायी बीआरटी बसेसची खरेदी रखडली होती, हे विसरून चालणार नाही.