मुंबई : महाड दुर्घटनेनंतर विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. या दुर्घटनेला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांच्यावर ३०२ चा  गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारां यांनी केलीय. 


चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर, महाडचा हा पूल धोकादायक नव्हता... या ब्रिटिशकालीन ब्रिजच्या बाजुलाच दुसरा पूल उभारण्यात आला होता... आणि त्यामुळे एक पूल जाण्यासाठी आणि दुसरा पूल येण्यासाठी वापरला जात होता. हा पूल सुस्थितीत असल्यामुळे वापरात होता... असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. 


मे महिन्यात पुलाची तपासणी... 


उल्लेखनीय म्हणजे, मे महिन्यातच या पुलाची तपासणी झाली होती... आणि तो वाहतुकीसाठी योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. 


...मग पूल कोसळलाच कसा?


पण, तीन महिन्यांपूर्वीच तपासणी झालेला हा पूल कोसळलाच कसा असा असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. तर या ब्रिटिशकालीन ब्रिजच्या सुरक्षेचा कालावधी संपलेला होता असं सांगतानाच या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.


सावित्री आणि काळ नदीचा संगम


महाबळेश्वरपासून महाडपर्यंत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. महाडच्या या ब्रिटिशकालीन पुलाच्या वरच्या भागात सावित्री नदीला काळ नदी येऊन मिळते. त्यामुळे,  पाण्याच्या प्रचंड वेगानं आणि दाबानं हा पूल कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.