सोलापूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला, ऐन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसलाय. 
 
 काँग्रेसच्या विद्यमान सहा नगरसेवकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केलाय. उमेदवारांसाठी खास सोय म्हणून पालिकेच्या वतीने रविवारीही अर्ज स्वीकृतीसाठी कार्यालय सुरु ठेवण्यात आलं होतं. नेमक्या त्याचवेळी काँग्रेसच्या विद्यमान सहा नगरसेवकांनी राजीनामे सादर केल्यानं सोलापुरातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 
 
 एकेकाळचे कट्टर सुशीलकुमार शिंदे समर्थक असलेले माजी महापौर महेश कोठे, सध्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख आहेत. काँग्रेसला चारी मुंड्या चित करण्याचा विडाच महेश कोठे यांनी उचललाय. त्याचाच भाग म्हणून सोलापुरातल्या गेल्या ५२ वर्षांच्या काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाला धक्का देत, महेश कोठेंनी काँग्रेसच्या विद्यमान सहा नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवून घेतलंय. 
 
 देवेंद्र कोठे, विनायक कोंड्याल, निर्मला नल्ला, विठ्ठल कोटा, राजकुमार हंचाटे, कुमुदिनी अंकाराम अशी या सहा गरसेवकांची नावं आहेत. हे सहाही जण महेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.