योगेश खरे, नाशिक : नाशिक बाजारसमितीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. वारंवार नोटीस बजावूनही देविदास पिंगळे हजर न झाल्यानं त्यांना अखेर अटक करण्यात आली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल दररोज होत असते. एका बाजारसमितीत भाजीपाला तर दुसऱ्या बाजारसमितीत फळं, कांदे-बटाटायाचा व्यवहार होतो. याच बाजारसमितीच्या वाहनातून दीड महिन्यापूर्वी नेण्यात येत असलेली ५७ लाखांची रोकड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडली होती.  यामध्ये बाजारसमिती कर्मचाऱ्यांनी दिलेल्या गोपनीय जबाबात देविदास पिंगळे यांचं नाव समोर आलं. 


या प्रकरणी चौकशीसाठी तीन वेळा बोलावूनही हजर होत नसल्यानं, अखेर देविदास पिंगळे यांना अटक करण्यात आली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलीय.  


नाशिक जिल्ह्यातल्या तेरा बाजारसमितींमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. देशभरातल्या बाजारसमितींमध्ये नाशिक बाजारसमिती आपलं वर्चस्व राखून आहे. मात्र देविदास पिंगळे यांच्या रुपात एक मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे. त्यामुळे यापुढेही नाशिक बाजासमितीचा कारभार, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारच्या निशाण्यावर असणार हे निश्चित.