धुळे : जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री  अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे जिल्ह्यातली सत्ता समीकरणं ज्या दोन शहरातून चालतात त्या शिरपूर आणि दोंडाईचा नगर पालिकेची निवडणूक तोंडावर आलीय. जिल्ह्यातली काँग्रेसची सूत्रं शिरपूरच्या जनक व्हिला म्हणजेच आमदार अमरिश पटेल यांच्या घरून हलतात तर भाजपची जिल्ह्यातली सूत्रं मंत्री जयकुमार रावल यांच्या राजमहालातून हलवली जातात. 


आमदार पटेल यांनी शिरपूर पालिकेवर काँग्रेसचा सत्तासूर्य मावळू दिलेला नाही. त्यांनी शिरपूर शहरात केलेली विकास कामं नेहमीच शिरपूरकरांचं नव्हे तर देशातील दिग्गज नेत्यांना भूरळ घालत आलीयत. पाणी अडवणं, दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा, रुंद रस्ते, शैक्षणिक संस्था, वॉटरपार्क, रीक्रिएशन पार्क अशा एका ना अनेक विकास कामांच्या माध्यमातून आमदार पटेल यांनी २७ पैकी २३ नगरसेवक निवडून आणले होते.  


दोंडाईचा पालिकेत राष्ट्रवादीच्या घड्याळानं डॉ. देशमुखांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांपासून सत्ता सांभाळली आहे. आता डॉ. देशमुखच काँग्रेसमध्ये गेलेत. त्यांनी २३ पैकी १७ जागांवर विजय मिळवून गेल्या वेळी मंत्री रावल यांच्या मक्याला पराभवाची चव चाखायला लावली होती. यावेळी डॉ. देशमुख पंज्यावर तर मंत्री रावल कमळाच्या चिन्हावर पालिका निवडणूक लढवणार असल्यानं दोघांचा कस लागणारेय तर दुसरीकडे शिरपूरमध्येही डेंग्यूचा उद्रेक काँग्रेसला ताप आणणारा ठरू शकतो. 


एकंदरीत यावेळी शिरपूरच्या ३० आणि दोंडाईचाच्या २४ जागांवर काट्याची लढत पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही ठिकाणी पदाधिकाऱ्यांपुरतीच मर्यादित असल्यानं खरी लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी असेल. त्यात भरीस भर नगराध्यक्ष थेट निवडला जाणार असल्यानं प्रति विधानसभेचंच रूप या निवडणुकीत असणार आहे.