नाशिक : महानगर पालिका निवडणूक तिकीट वाटपावरून शिवसेनेत आज चांगलच राडा झाला. माजी महापौर विनायक पांडे यांच्या मुलाला उमेदवारी नाकारल्याने संतप्त पांडे समर्थकांनी महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांना बेदम मारहाण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिका निवडणुकीतील बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरपर्यंत सस्पेन्स कायम ठेवायचा, शेवटच्या क्षणी उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रथा शिवसेना शहरप्रमुखांना चांगलीच महागात पडली. माजी महापौर विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज पांडे याला प्रभाग क्रमांक २४ मधून उमेदवारी नाकारल्याने पांडे समर्थकांनी शहरप्रमुख अजय बोरस्ते एबी फॉर्मचे वाटप सुरु असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन बेदम मारहाण केली.


मारहाणीचं वृत्त समजताच बोरस्ते समर्थकही हॉटेलकडे धावले. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असतनाच पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पैसे घेऊन तिकीट वाटप केल जात असून निष्ठावान शिवसैनिकांना डावलले गेल्याचा गंभीर आरोप माजी महापौरांनी केला आहे.


शिवसेना शहरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सर्व आरोपांचं खंडन केले आहे. उमेदवार यादी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आमदार, खासदार, संपर्क प्रमुख यांच्या कोअर टीमने तयार केलीय. विनायक पांडे यांना त्यांच्या घरात तीन तिकीट पाहिजे होते. त्यातही पक्षाने दोन दिली होती. 


मात्र, प्रभाग क्रमांक २४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवक शिवाजी चुंबळे यांना तिकीट देण्याचे आदेश होते असा खुलासा बोरस्ते यांनी केला असून पक्ष शिस्त मोडणाऱ्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.



बोरस्ते यांनी बेदम मारहाणीचा दावा खोडून काढलाय. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आठ दहा शिवसैनिकांना ताब्यात घेतलंय. मात्र मारहाणीची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.


दरम्यान ऋतुराज आणि भावजय कल्पना पांडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. पण कल्पना पांडे याच केवळ फॉर्म भरू शकल्या. ऋतुराज यांनी नाराजीमुळे फॉर्म न भरल्याचं सांगितले आहे.