कल्याण : कल्याणमध्ये काल रात्री महावितरणच्या कार्यालयाची नागरिकांनी तोडफोड केली. तसेच रास्ता रोको करून आग्रा रोडवरची वाहतूक अनेक तास अडवून धरली. 


दोन दिवस वीज गूल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडवणीस सरकारनं स्मार्टसिटी करण्याचा चंग बांधलेल्या कल्याणमध्ये नागरिक हैराण झालेत. टिळक चौक, अहिल्याबाई चौक, पारनाका, दुधनाका, आग्रा रोड, आधारवाडी, गांधारी रोड, श्री कॉम्प्लेक्स, दुर्गाडी या भागात गेल्या दोन दिवसांपासून रात्रभर वीज गूल होतेय.


२.५ लाख नागरिक अंधारात


ऐन उकाड्यात सुमारे अडीच लाख लोकांना रात्रच्या रात्र जागून काढावी लागतेय. दोन्ही दिवस रात्री ११ ते साडेतीनपर्यंत वीजपुरवठा खंडीत झाला होता. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना धड उत्तरं देण्यासाठी एकही कर्मचारी-अधिकारी महावितरण कार्यालयात नव्हता. 


इतकंच नव्हे, तर अधिकारी-जनसंपर्क अधिका-यांचे फोनही लागत नव्हते. लागलेच तर अत्यंत थातुरमातूर उत्तरं दिली जात होती. विशेष म्हणजे रेल्वे क्रॉसिंगजवळ जंपर तुटल्यानं लाईट गेले आहेत, हेच कारण दोन्ही दिवस सांगितलं जात असल्याचं काही नागरिकांनी झी मीडियाला सांगितलंय. त्यामुळे हे छुपं लोडशेडींग तर नाहीये ना, अशीही शंका काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.


बांध फुटला आणि कार्यालयाची तोडफोड


अखेर लोकांच्या संयमाचा बांध फुटला आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. कार्यालयात किंवा फोनवर महावितरणचा एकही अधिकारी धड उत्तर देत नसल्याचा संतापजनक अनुभव नागरिक घेत होते. अखेर काल नागरिकांच्या संतापाचा बांध फुटला. एकीकडे महावितरण कार्यालयात गोंधळ सुरू असताना संतप्त नागरिकांनी आग्रा रोड हा शहरातला मुख्य रस्ता अडवून धरला. ठाण्यातल्या साकेत पुलाच्या कामामुळे सध्या या रस्त्यावर अवजड वाहनांची दाटी आहे. या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.