अखिलेश हळवे / नागपूर : शेतकरी आत्महत्येने शापित असलेल्या विदर्भाच्या भूगर्भात अपार खनिज संपत्ती दडली आहे. नागपूर जिल्ह्यात सोने, तर चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे साठे असल्याचा अंदाज भारतीय भूसर्वेक्षण विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्याच्या मातीत दडलेल्या या खनिज संपत्तीचा शोध लावण्याकरिता सरकारने विशेष शोध मोहीम हाती घेतलीय. छोट्या विमानाच्या माध्यमाने या ४ जिल्ह्यांचे सर्वेक्षण करून जमिनीत दडलेली ही खनिज संपत्ती शोधली जाणार आहे.  


केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या भारतीय भूसर्वेक्षण विभागातर्फे देशातील महत्वाच्या राज्यात दडलेल्या खनिज संपत्तीचा शोध या छोटेखानी विमानांच्या माध्यमाने घेतला जाणार आहे. या विमानांच्या खाली विशेष प्रकारचे कॅमेरे आणि बाजूला चुंबक लागले आहेत. ही विमानं जमिनिपासून फक्त ८० मीटर उंचीवरून उडणार आहेत.



दिसायला छोटी असली तरीही हि विमानं अतिशय महत्वाचे काम करणार असून जमिनीच्या पोटात सुमारे ३०-३५ किलोमीटर आत काय आहे याचा शोध हि विमानं घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या ४ राज्यात हे सर्वेक्षण होणार आहे. 


या अंतर्गत प्राथमिक सर्वेक्षणात नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील पोलार परसोडी गावात सोन्याचे साठे असल्याचा अंदाज आहे. या शिवाय चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे साठे असल्याचे पुरावे मिळाल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.



सोने आणि तांब्याशिवाय नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात शिसं, टीन, टंगस्टनसारख्या महत्वाच्या खनिजांचा शोध लागल्याचंही सर्वेक्षणात समोर आलंय. या कामाकरिता न्यूझीलंडमधली संस्थेशी करार झाला आहे. 


विमानांना लागलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमाने जमिनीखाली नेमके दडले काय दृश्ये मिळतील. मिळालेल्या दृश्याच्या आणि माहितीच्या आधारे खनिज उत्खनासंबंधी कारवाई सरकार करणार आहे.