विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील २७ गावे व दिवा परिसरातील भीषण पाणी टंचाईची दखल घेऊन २७ गावांकरता २५ एमएलडी व दिवा भागाकरता १० एमएलडी पाणी वाढवण्याचा निर्णय मंगळवारी येथे घेण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ,आमदार सुभाष भोईर, ठाणे महापालिकेचे महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अन्सारी आदी अधिकारी उपस्थित होते. 


२७ गावे, तसेच दिवा येथे तीव्र पाणीटंचाईने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यामुळे खा. डॉ.श्रीकांत शिंदे, तसेच दोन्ही महापालिकांमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पाण्याचा कोटा वाढवण्याची मागणी वारंवार जलसंपदा मंत्री महाजन, पालकमंत्री शिंदे आणि एम आय डी सी यांच्याकडे केली होती. तिची दखल घेऊन मंगळवारी मंत्रालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरातील पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढत असून दिवा विभागातील नागरिक रेल्वेने पाणी आणत असल्याकडे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी महाजन यांचे लक्ष वेधले. 


यंदाचा उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक असल्यामुळे २७ गावे तसेच दिव्यासाठी पाण्याचा कोटा वाढवून देण्याची आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली.


त्यानुसार २७ गावांसाठी २५ एम एल डी आणि आणि दिव्यासाठी १० एम एल डी पाणी वाढवून देण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.


या परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल ठाणे महानगर पालिका आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानण्यात आले.