मुंबई : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगराध्यक्षपदाच्या 11 जागांसाठी 92; तर सदस्यपदाच्या 244 जागांसाठी 1 हजार 190 उमेदवारांमध्ये लढत होत आहे.राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींसाठी (एकूण 212) चार टप्प्यांतील निवडणूक कार्यक्रमाची 17 ऑक्टोबर 2016 रोजी घोषणा केली होती. 


27 नोव्हेंबर, 14 व 18 डिसेंबर 2016 रोजी पहिल्या तीन टप्प्यांतील निवडणुका पार पडल्या आहेत. एकूण 212 पैकी शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही; तर वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेस न्यायालयाने स्थगिती दिली.  त्यामुळे या दोन्ही ठिकाणची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. 


चौथ्या व अंतिम टप्प्यात मतदान होत असलेल्या 11 नगरपरिषदांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 9 आणि गोंदिया जिल्ह्यातील 2 नगरपरिषदांचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी एकूण 3 लाख 82 हजार 60 मतदार आहेत. त्यात 1 लाख 91 हजार 791 पुरुष, 1 लाख 90 हजार 263 महिला व 6 इतर मतदारांचा समावेश आहे. 


एकूण 502 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी 9 जानेवारी 2017 रोजी मतमोजणी होईल.


नगरपरिषदनिहाय सदस्य व अध्यक्षपदाच्या उमेदवारांची संख्या (कंसात सदस्यपदाच्या जागा): नागपूर: कामटी (32): 189- 12, उमरेड (25):  133- 8, काटोल (23): 114- 9, कळमेश्वर (17): 67- 8, मोहपा (17): 68- 7, रामटेक (17): 81- 7, नरखेड (17): 73- 9, खापा (17): 61- 5 व सावनेर (20): 75- 5. गोंदिया: गोंदिया (42): 257- 14 व तिरोरा (17): 72- 8. एकूण (244): 1,190- 92.