शंभरीनंतरही नाशिकमधल्या त्या पुलाचं ऑडिट नाही
महाराष्ट्रातील एकही शहर असं नसेल जिथे ब्रिटीशकालीन पूल नाही.
नाशिक : महाराष्ट्रातील एकही शहर असं नसेल जिथे ब्रिटीशकालीन पूल नाही. असाच शंभरी ओलांडलेला एक पूल नाशिकमध्ये आहे ज्याचं गेल्या कित्येक वर्षापासून ऑडीटच झालेलं नाही.
नाशिकच्या गोदावरी नदीवर १४ जानेवारी १८९५ मध्ये बांधण्यात आलेला पूर्वीचा व्हीक्टोरिया आणि आताचा अहिल्याबाई होळकर पूल हा नाशिकच्या पंचवटी आणि मुख्य शहराला जोडणारा गोदावरी नदीवरचा हा पहिला पूल आहे. ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेल्या ह्या भरभक्कम पुलाने शंभरी ओलांडून २० वर्ष उलटून गेलेत. त्यानंतर म्हणजेच 2003-04 मध्ये होळकर पुलाला समांतर पूल बांधण्यात आला आणि दोन्ही पुलावरून एकेरी वाहतूक सुरु झाली.
त्यावेळी होळकर पुलाला फुटपाथ वाढवून सिमेंट काँक्रीटच्या पिलरचा आधार देण्यात आला. मात्र तेव्हापासून आजतागायत या पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेय. पुलाचे दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडीट करणे गरजेचे असताना ते केले जात नाही. पुलाच्या भिंतीवर पिंपळाची झाड उगली आहेत.
खोलवर जाणाऱ्या झाडांची मुळं पुलाचे खांब खिळखिळे करत आहेत. काही दगडामधील भेगा रुंदावत चालल्यात त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुलाच्या देखभालीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. विशेष म्हणजे मनसे अध्यक्षांनी याचं पुलावर उभे राहून बुधवारी गोदावरीच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला होता.
नाशिकमध्ये केवळ होळकर पुलच नाही तर नाशिक पुणे महामार्गावर दारणा नदीवर १९२५ मध्ये बांधण्यात आलेल्या पुलासह अनेक पूल ब्रिटीश काळातील आहेत.