पुणे : शहरात आज कोणीही विचार केला नसेल अशी गोष्ट घडली. वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ पुणेकरांनी घेतली.  त्यासाठी पुणेकरांनी एकमेकांचे हात हाती धरून चक्क मानवी साखळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानवी साखळीमध्ये सुमारे एक लाख विद्यार्थी तसंच नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पुण्यातल्या बेशिस्त ट्रॅफीकचे किस्से राज्यात प्रसिद्ध आहेत. अर्थात त्यासाठी अनेक कारणे असली तरी शिस्तीचा अभाव हे त्यातलं प्रमुख कारण आहे हे पुणेकरही मान्य करतात. त्यामुळे आता 'हे' सुधारायचं असं पुणेकरांनी ठरवलं आणि वाहतुकीचे नियम पाळायची शपथ घेतली.


शहरातील सगळ्या रस्त्यात तसंच चौकांत मानवी साखळी करून वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहनही केले. सकाळी अकराच्या सुमाराला संपूर्ण पुणे शहर काही क्षणांसाठी आहे त्या ठिकाणी स्तब्ध झालं आणि सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची एकसाथ शपथ घेतली.


वाहतुकीच्या काही नियमांबाबत पुणेकरांचं चक्क एकमत झाले आहे. वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवा, गाडी चालवताना सीट बेल्ट लावा, गाडी चालवताना फोनवर बोलू नका, सिग्नल तोडू नका तसंच अँब्युलन्सला प्राधान्याने रस्ता द्या हे पाच नियम 'कर्तव्य' म्हणून तरी पाळा असे आवाहन करण्यात आले.