तिळ बाजारात राज्यात पिकलेल्या गावरान तिळावर संक्रांत
राज्यभरातील बाजारांना सध्या चाहूल लागलीय ती मकरसंक्रांत अर्थात तिळसंक्रांतीची... मात्र सध्या तिळाच्या बाजारात राज्यात पिकलेल्या गावरान तिळावर संक्रांत आल्याचे दिसत आहे.
अकोला : राज्यभरातील बाजारांना सध्या चाहूल लागलीय ती मकरसंक्रांत अर्थात तिळसंक्रांतीची... मात्र सध्या तिळाच्या बाजारात राज्यात पिकलेल्या गावरान तिळावर संक्रांत आल्याचे दिसत आहे.
मकरसंक्रांतीला गूळ आणि तिळाचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यामुळेच दरवर्षी अकोल्याच्या बाजारातल्या गावरान तिळाला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. मात्र यंदा गावरान तिळावरच संक्रांत आल्याचं दिसतंय. नोटबंदीनंतर परिसरातल्या शेतक-यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवलीय.
पाहिजे त्या तुलनेत गावरान तीळ बाजारात दाखल झालेला नाही. सध्या गुजरातमधला पॅकिंग तीळ अकोल्यात दाखल झालाय. गुजरातचे पॅकिंग तीळ स्वच्छ असल्यानं ग्राहकांच्या पसंतीस उतरतायत. त्यामुळे गावरान तिळाच्या तुलनेत महाग असूनही ग्राहक गुजरातच्या तिळाला पसंती देताना दिसतायत.
यंदा अती पावसामुळे राज्यातला तिळाचा पेराही कमी झालाय. त्याच तुलनेत गुजरातमध्ये मात्र तिळाचं चांगलं उत्पादन झालंय. त्यामुळेच तिळाचं उत्पादन घेवून दोन अधिकचे पैसे कमवू पाहणा-या तीळ उत्पादकांच्या स्वप्नांवर यामुळे संक्रांत आल्याचं दिसतंय.