डोंबिवली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात शिवसेनेनं केलेल्या आंदोलनाचा राग डोंबिवलीतल्या भाजप कार्यकर्त्यांना सहन झाला नाही. त्यामुळं त्यांनी शिवसेना शहरप्रमुखांवर शाई फेकली. यामुळं आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी रौद्रावतार धारण केला. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत डोंबिवलीत हा राजकीय थरार रंगला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपच्या एकमेकांविरोधातील निदर्शनांनी काल रात्री उग्र रूप धारण केल्याचे दिसून आले. भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात तीव्र आंदोलन केल्याने संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट शिवसेना डोंबिवली शहरप्रमुखांवर शाई फेकल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास शिवसेना डोंबिवली शाखेतर्फे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. त्या सोबतीला शिव्यांची लाखोली आणि चपलेचा मारही होता. 


शिवसेनेच्या या निदर्शनांनंतर मग संध्याकाळी भाजपनेही 'सामना' वृत्तपात्राची होळी करून सेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे बहुधा या आंदोलनावर समाधान झाले नसावे. म्हणून की काय गुरुवारी रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास भाजप नगरसेवक महेश पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांना त्यांच्या घराखाली गाठले. त्यांच्या अंगावर शाई ओतून चेहऱ्याला काळे फासून आपला रोष व्यक्त केला. 


भाजपकडून अचानक आलेल्या या प्रतिक्रियेमुळे सेनेमध्ये एकच खळबळ उडाली..ही घटना पसरताच शिवसैनिक संतप्त झाले..हजारो शिवसैनिक डोंबिवली च्या मध्यवर्ती कार्यलया समोर जमू लागल्याने तणाव निर्माण झाला..सर्व पदाधिकारी,नगरसेवक आमदार आले असता आक्रमक झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी इंदिरा चौकात भाजप च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आणि थेट शेकडो शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यल्यावर धडक दिली..मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना रोखल्याने मोठा संघर्ष टळला.


संतापलेल्या शिवसैनिकांनी भाजप कार्यलयावर दगडफेक केली आणि आपला रोष व्यक्त केला..पुढे हा मोर्चा रामनगर पोलिस ठाण्यात वळवत तब्बल 4 तास ठिय्या देत महेश पाटील च्या अटकेची मागणी केली..या दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि मध्यरात्री 2च्या सुमारास पालकमंत्री एकनाथ शिंदे पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी पोलिसांना  चांगलेच धारेवर धरत शाइफेक करणा-यावर कठोर कारवाईची मागणी केली.


अखेर महेश पाटील आणि त्याच्या इतर 40 साथीदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 4 तासांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. त्यामुळे अजून काही दिवस तरी डोंबिवलीत सेना विरुद्ध भाजप हा वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीत.