यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमधल्या अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पालकांचा संताप वाढतच चालला आहे. जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांच्या घरासमोर पुन्हा संतप्त पालकांचा जमाव जमला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या एज्युकेशन सोसायटीची यवतमाळ पब्लिक स्कूल ही शाळा आहे. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र पालक आणि त्यांचे नातेवाईक कमालीचे बिथरलेले होते. त्यांनी दर्डांच्या नामफलकाची तोडफोड केली. यावेळी बेभान जमावानं दगडफेक करत पोलिसांबरोबर झटापटही केली. 


बिथरलेल्या जमावाला नियंत्रण आणण्याकरता पोलिसांनी हवेत गोळीबार केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यवतमाळ शहरात दाखल झाले आहेत. सोबतच एसआरपीएफ आणि पोलिसांची अतिरिक्त कुमकही शहरात तैनात करण्यात आली आहे. 


या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी शनिवारी पालकांची बैठक बोलावली होती. पण बैठकीत संस्थाचालकावर ठोस कारवाईची भूमिका त्यांनी घेतलीच नाही. त्यामुळं त्यांनाही पालकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. 


संतप्त पालकांनी राठोड यांच्यापुढे बांगड्या ठेवत तीव्र संताप व्यक्त केला. आरोपी यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर यांना दर्डा एज्युकेशन सोसायटी पाठीशी घालत असल्याचा पालकांचा थेट आरोप आहे. संस्थाचालकाच्या अटकेची त्यांनी मागणी केली. 


या बैठकीला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही उपस्थित होते. मात्र पालकांच्या प्रश्नांना कुणीही समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही. त्यामुळे गदारोळातच ही बैठक संपली.