कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : नोटाबंदीची झळ सामान्यांना बसत असली तरी काहीजण मात्र यामध्ये चांगलेच हात धुऊन घेतायत. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील नागरी सुविधा केंद्रांमध्येही असाच प्रकार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कररूपी जमा झालेल्या रकमेतील नव्या दोन हजारांच्या नोटा जमा न करता त्याऐवजी जुन्या पाचशे हजारांच्या नोटा जमा केल्याचा प्रकार समोर आलाय.
 
 नोटाबंदीनंतर मुंबई महापालिकेने विविध करांची रक्कम जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटांमध्ये भरण्याची सवलत काही दिवसांसाठी जनतेला दिली होती. त्यामुळं अनेकांनी थकीत करभरणा मोठ्या प्रमाणात जमा केला होता, यावेळी काहींनी दोन हजारांच्या नव्या नोटाही कररूपात नागरी सुविधा केंद्रात जमा केल्या होत्या. 
 
 मुलूंड येथील टी वॉर्ड ऑफिसमध्ये १६ नोव्हेंबरला 2 हजारांच्या नोटा भरणा झाल्याची नोंद दिसते, परंतु बँकेत भरताना मात्र दोन हजारांच्या नोटा बँकेत भरल्याच गेल्या नसल्याचे समोर आलंय. 
 
 संबंधित अधिका-यांनी दोन हजारांऐवजी जुन्या हजार, पाचशेच्या नोटा एचडीएफसी बँकेत भरल्या गेल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीत केला.सर्व २४ वॉर्ड ऑफिसमधील नागरी सुविधा केंद्राच असाच प्रकार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी मनसेनं केलीय.


सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका घेतलीय.


नोटबंदीमुळं सामान्य लोकांना त्रास होत असला तरी काहींनी याचे रूपांतर पैसे पांढरे करण्याच्या संधीत केल्याचे समोर येतंय.