दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांनी काल जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त केलेली भावना चर्चेचा विषय ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेच्या सध्या असलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर अमित ठाकरे यांनी केलेलं हे मार्मिक भाष्य आहे. 'Down but not out...' असं सूचक भाष्य अमित ठाकरे यांनी केलंय. त्याला अमित यांनी एका व्यंगचित्राची जोड दिली आहे. 


२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या जॉन विक (john wick) या हॉलिवूड पटातील व्यक्तीरेखा अमित यांनी व्यंगचित्रातून साकारली आहे. या चित्रपटाचा नायक कियानो रिव्हज् याने जॉन विकची व्यक्तिरेखा साकारलीय. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपलं ध्येय नायक गाठतो, असं या चित्रपटाचं कथानक आहे. तेच अमित यांनी आपल्या व्यंगचित्रात मनसेच्या बाबतीत म्हटलंय.


२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांपर्यंत मनसेला अपयशाला सामोरं जावं लागतंय. मनसेचा सध्या अत्यंत खडतर काळ सुरू आहे. राजकीय टिकाव लागत नसल्यामुळे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तर अस्वस्थ आहेतच... त्याहूनही नेत्यांची काही वेगळी परिस्थिती नाही. मनसेत मोठ्ठं गळतीसत्र सुरू आहे. त्या अनुषंगाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना आश्वासक धीर देण्याचा प्रयत्न अमित ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे केलाय, ज्याला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, असं म्हटलं जातंय.