मराठा मोर्चाना वाढता प्रतिसाद, शिवसेनेत खलबतं
मराठा मोर्चाना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहाता अन्य राजकीय पक्षांप्रमाणे शिवसेनाही सावध झालीये. या मोर्चाबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी यावर शिवसेनेत खलबतं सुरु झालीयेत. आता मुद्दा हाच आहे की, आरक्षणाबाबातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी नेमून दिलेल्या मूळ भूमिकेवरच पक्ष नेतृत्व ठाम राहणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दिनेश दुखंडे, मुंबई : मराठा मोर्चाना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहाता अन्य राजकीय पक्षांप्रमाणे शिवसेनाही सावध झालीये. या मोर्चाबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी यावर शिवसेनेत खलबतं सुरु झालीयेत. आता मुद्दा हाच आहे की, आरक्षणाबाबातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी नेमून दिलेल्या मूळ भूमिकेवरच पक्ष नेतृत्व ठाम राहणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका मांडण्याखेरीज पर्याय नसल्याचे त्यांनाही आता व्यवस्थित समजले आहे. मराठा समाजाच्या मोर्चांना मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादाने प्रत्येक राजकीय पक्षाला चिंतन करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळेच की काय बुधवारी शिवसेनाभवनात भले विविध राजकीय पक्षाच्या लोकांची शिवसेनेत प्रवेशासाठी मोठी वर्दळ होती, पण उद्धव ठाकरे यांचे लक्ष मात्र विचलित होते. यापक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला निव्वळ पंधरा मिनिटं उपस्थिती लावून बाकीचे सुमारे अडीच ते तीन तास त्यांनी पक्षातील प्रमुख मराठा नेत्यांशी मोर्चाबाबत चर्चा केली.
अचानक सुरु झालेल्या या मोर्चामागची नेमकी कारणे काय, कुठली राजकीय ताकद वा फूस त्यामागे आहे का? याची माहिती घेण्याचे काम शिवसेना नेतृत्वाकडून सुरु झाले आहे. प्रत्यक्ष मराठा मोर्चात सहभागी झालेल्या पक्षातील नेत्यांकडून नेमक्या परिस्थितिचा अंदाजही त्यांनी घेतला आहे. मोर्चा आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी या नेत्यांना केल्या आहेत.
कोणावर आहे जबाबदारी?
मराठवाड्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, उत्तर महाराष्ट्रात राज्यमंत्री दादा भुसे, विदर्भात खासदार भावना गवळी आणि मुंबई-ठाणे-कोकणात एकनाथ शिंदे, अशी विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाती-धर्म निहाय आरक्षणाला विरोध करताना, आर्थिक निकषावरच आरक्षण देण्यात यावे ही परखड भूमिका वेळोवेळी मांडली. मात्र, आता मराठा मोर्चानी महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाल्यामुळे शिवसेनेला ती भूमिका राजकीयदृष्टया किती फायद्याची ठरते हा प्रश्न आहे.
काय आहे शिवसेनेची भूमिका?
राज्यात एकहाती सत्ता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री ही उद्धव ठाकरे यांची महत्वकांक्षा आहे, जी त्यांनी अनेकदा जाहीररित्या मांडली आहे. आज शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी निम्मे मराठा समाजाचे आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या प्रमुख महापालिका निवडणुकाजवळ येऊन ठेपल्यात. त्यामुळे मराठा मोर्चाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव असणे सहाजिकच आहे.
मराठा समाजाचा समारोपाच्या मुंबईतल्या मोर्चाचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. तरी तो दिवाळीआधी काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे मराठा मोर्चाबाबत आपली नेमकी भूमिका विस्ताराने स्पष्ट करण्याचे संकेत मिळत आहेत.