मुंबई : पोलीस भरती दरम्यान गर्दीमुळे परिक्षार्थींचे मोठ्या प्रमाणात हाल होतात, ही गर्दी टाळण्यासाठी पोलीस भरतीत, आता प्रथम लेखी परीक्षा घेण्याचा विचार पोलीस खात्याकडून सुरू आहे. पोलीस खात्यातील १ जागेसाठी १५० पेक्षा अधिक उमेदवार या प्रमाणात अर्ज आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्याचा विचार पोलीस खात्याचा आहे. या भरती प्रक्रियेतील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांचीच शारीरिक चाचणी घेण्यात येईल.


शारीरिक परीक्षेसाठी यंदा किमान ३० दिवसांचा कालावधी लागेल. शारीरिक क्षमता चाचणीसाठी अधिक वेळ लागतो. कारण समन्वय आणि चाचणीसाठी जागेच्या निवडीपासून ते पूर्वतयारीपर्यंत अनेक बाबींकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे प्रथम लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक परीक्षा ठेवल्यास तुलनेत ही प्रक्रिया अधिक सोपी आहे. लेखी आणि शारीरिक परीक्षेसाठी प्रत्येकी १०० गुण असतील.


४ हजार ८३३ रिक्त जागांच्या या भरतीसाठी ७ लाख ५८ हजार ७२२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्या ५ जिल्ह्यांतून सर्वाधिक अर्ज आले आहेत. त्यात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर ग्रामीण आणि पालघर या शहरांचा समावेश आहे.