मुंबई : शिवाजी पार्कवर उद्या होणा-या दसरा मेळाव्याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार आणि भाजपावर बरसणार का याबाबत उत्सुकता आहे. उद्याच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, दोन दिवस पाऊस गायब झाल्याने शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी दसरा मेळाव्यावरचे सावट दूर झाले आहे. पावसामुळे मेळावा होणार की नाही, याची कुजबुज सुरु होती. मात्र, शिवसेनेने मेळावा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवतिर्थावर वाघाची डरकाळी घुमणार आहे.


११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता शिवतीर्थ अर्थात दादरमधील शिवाजी पार्क येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.


यंदा शिवसेनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने हा दसरा मेळावा दणक्यात साजरा करण्यासाठी तयारी सुरु आहे. या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक येणार आहेत. या दसरा मेळाव्यात राज्यात आणि देशात घडणार्‍या घडामोडींवर तसेच महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, शिवसैनिकांना कोणता संदेश देणार याकडे लक्ष लागले आहे.


यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सर्व शिवसेना नेते, उपनेते, केंद्रीय व राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधी तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला जिल्हा संघटकांपासून गटप्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.


शस्त्रपूजा आणि रावणदहन


या दसरा मेळाव्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा असलेली शस्त्रपूजा शिवतीर्थावर केली जाणार आहे. यावेळी शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिक एकमेकांना सोने देऊन शुभेच्छा देणार आहेत. रावणदहनाचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे, असे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेय.