मुंबई : नोटबंदीनंतर मुंबईत लोकल तिकीट तसेच पास काढताना सुट्टे पैसे नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तिकीट खिडकीवर वादावादी पाहायला मिळत आहे. यावर मध्य रेल्वेने कॅशलेस व्यवहार करण्यास प्राधान्य दिले आहे. प्रथम चार स्थानकांवर स्वाईप मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे डेबिट कार्डचा वापर करुन तुम्ही लोकल तिकीट आणि पास काढू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर  केंद्र सरकारने कॅशलेस सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रेल्वेकडूनही तिकीट काढण्यासाठी कॅशलेसचा प्रयोग केला जात आहे. मध्य रेल्वेवर या सुविधेला सुरुवात झाली आहे. प्रथम मेल-एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी असणाऱ्या आरक्षण केंद्रावरील खिडक्यांवर पीओएस मशिन बसवून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.


मध्य रेल्वेकडून हा पर्याय स्वीकारण्यात आला. त्याचा प्रस्ताव व माहिती रेल्वे बोर्डाला पाठवल्यानंतर, मंजुरीही देण्यात आली आणि सोमवारी प्रथम सीएसटी स्थानकातील आरक्षण तिकीटप्रणाली केंद्रावर पीओएस मशिन बसवून कॅशलेस सुविधेला सुरुवात केली. या मशिनमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करून तिकिटांचे पैसे अदा केले जाऊ शकतात. सुरुवातीला एकूण ७00 मशिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 


या ठिकाणी स्वाईप मशिन


पहिला टप्पा म्हणून मंगळवारपर्यंत सीएसटी, एलटीटी, कुर्ला, चेंबूर अशा स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर ३४ पीओएस मशिन बसवण्यात आले, तर आणखी ४१ मशिन अन्य काही स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर त्वरित बसवण्यात येतील, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल  यांनी सांगितले. ही सेवा देताना तिकिटांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.