मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेली पक्षाच्या मंत्र्याची बैठक संपली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मंत्र्याना सक्त आदेश दिलेत. सर्वांना जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी जावेच लागेल, असे बजावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर शिवसेना मंत्री व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मंत्र्यांना स्पष्ट आदेश दिल्याचे पर्यटन मंत्री रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


नगरपालिका नगर पंचायत निवडणुकीत राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष असल्याचे सिद्ध झालेय. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सत्तेत असून पक्षाने सत्तेचा वापर केला नाही, अशी नाराजी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत व्यक्त केली होती.


शिवसेनेच्या भाजपच्या तुलनेने कमी मिळालेल्या यशावर उद्धव पक्षाच्या मंत्र्याच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. तसेच शिवसेना भाजप युती संदर्भात अंतिम निर्णय पक्ष प्रमुख यांचे असल्याचे बैठकीला उपस्थित राहिलेल्या मंत्र्यानी सांगितले. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निश्चित करण्याचे काम उद्धव ठाकरे मंत्री, स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून घेत आहेत.


दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मंत्र्यांनी आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरश: संपूर्ण राज्य प्रचाराने पिंजून काढला होता. त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान, शिवसेनेशी युती केली तर ती आमच्या अटींवरच होईल, केवळ सत्तेसाठी नाही, असे ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी अनेक मुद्दय़ांवर मतभेद असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले होते.