पुणे : पुण्याच्या बालेवाडी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधानांनी काही खास व्यक्तींची भेट घेतली यांत पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी इथल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचाही समावेश होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मोहिमेला चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेल्या भरीव आर्थिक मदतीमुळं मोदींनी त्यांचं कौतुक केलं. मोदींच्या 15 ऑगस्टचं भाषण चंद्रकांत कुलकर्णी यांनी ऐकलं. मोदींची ही कल्पना कुलकर्णी यांना भावली. पंधरा हजार निवृत्ती वेतनातील प्रत्येक महिन्याचे पाच हजार याप्रमाणे 52 महिन्यांचे तब्बल 2 लाख 60 हजार रुपयांचे आगाऊ धनादेश त्यांनी मोदींच्या या मोहिमेसाठी दिले. 


एका निवृत्त शिक्षकाच्या या दातृत्वाची मोदींनी दखल घेतली. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात मोदींनी कुलकर्णी यांना आवर्जून आमंत्रित केलं. मन की बात मध्येही कुलकर्णी यांचा आवर्जून उल्लेख करत मोदींनी फेसबुकवर कुलकर्णी कुटुंबियांच्या भेटीचा फोटोही उपलोड केला. यामुळं ही भेट सुखद धक्का असल्याचं चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितलंय. तर यावेळी मोदींनी कुलकर्णी यांच्या नातवाचा आपुलकीनं कानही पिळला.