Anna Hazare On Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनी लॉन्ड्रिंग केल्याचा ठपका ठेवत सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने गुरुवारी रात्री अटक केली. केजरीवाल यांच्याविरोधात कथित मद्यविक्री घोटाळा प्रकरणा कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. असं असतानाच अरविंद केजरीवाल हे ज्या लोकपाल विधेयक आंदोलनातून समोर आले त्याचं नेतृत्व करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. अण्णा हजारेंनी केजरीवाल यांना फटकारलं आहे. केजरीवाल यांना अटक झाल्याचं आपल्याला वाईट वाटलं नाही कारण त्यांनी जे कृत्य केलं त्याबद्दल त्यांना अटक झाली आहे. समाजिक कामात हानी झाली असती तर मला वाईट वाटलं असतं, असं अण्णा हजारे म्हणाले.


सत्तेसमोर काही करता येत नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केजरीवाल यांच्या अटकेनंतर प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये अण्णा हजारेंनी झालेली कारवाई ही केलेल्या कृत्याची फळं असल्याचं म्हटलं आहे. "अरविंद केजरीवालसारखा व्यक्ती माझ्याबरोबर काम करताना दारुविरुद्ध आवाज उठवत होता. आत तोच व्यक्ती दारु बनवत आहे याचं मला दु:ख झालं. मात्र करणार काय? सत्तेसमोर काहीही करता येत नाही. त्याला जी अटक करण्यात आली आहे ती त्याच्या कृतीमुळे झाली. त्याने ती कृती केली नसती तर त्याला अटक झाली नसती. आता अटक झाल्यानंतर कायदेशीररित्या पुढे प्रक्रिया होईल. त्यासंदर्भातील कारवाई कायदा आणि सरकार पाहील. तेच ठरवतील योग्य काय आणि वाईट काय," असं अण्णा हजारे म्हणाले.


नक्की वाचा >> केजरीवाल यांना जेलमधून मुख्यमंत्री म्हणून काम करता येईल का? कायदा काय सांगतो?


मी त्यांना दारु धोरणासंदर्भात पत्र लिहिलं होतं पण...


केजरीवाल यांनी दारु धोरण तयार करण्याआधी आपण अनेकदा त्यांना पत्र लिहिलं होतं असंही अण्णा हजारे म्हणाले. "त्यांना (केजरीवाल यांना) मी पत्र लिहिलं होतं. नवीन दारु धोरण निश्चित करताना काय करावं ही तुमची जबाबदारी आहे. मात्र तुम्ही दारुबद्दल का बोलत आहात? समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यावर बोला ना. दारुचं धोरण तुम्ही तयार केलं. दारु वाईट आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्याचं धोरण तयार करणं हे किती योग्य आहे? आम्ही मागील अनेक वर्षांपासून आम्ही समाजाच्या भल्यासाठी काम करत आहोत. त्यांच्या डोक्यात हे विचार कुठून आले कळत नाही," असं अण्णा हजारे म्हणाले. "मी अनेकदा त्यांना पत्र लिहिलं. पण त्यांच्या डोक्यात मला सांगायच्या आहेत त्या गोष्टी गेल्या नाहीत आणि आज अखेर अटक झाली," असंही ते अण्णा हजारेंनी नमूद केलं. 


नक्की वाचा >> केजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'


मला अटकेचं वाईट वाटलं नाही


"केजरीवाल यांनी अनेक वर्ष तुमच्यासोबत काम केलं आहे. आज त्यांना अटक झाल्याचं पाहून वाईट वाटतं का?" असा प्रश्न विचारला असता अण्णा हजारेंनी नाही असं उत्तर दिलं. "मला याचं (केजरीवाल यांच्या अटकेचं) वाईट वाटलं नाही. समाजाच्या भल्यासाठी काम करताना हानी पोहचल्यास मला वाईट वाटलं असतं. माझ्यासमोर संपूर्ण समाज आणि देश आहे. अशा गोष्टींसाठी मला वाईट वाटत नाही. कायद्याच्या स्तरावर कायदा आणि सरकार काय ते पाहून घेईल. जे व्हायचंय ते होईल," असं अण्णा हजारे म्हणाले.