नाशिक: नाशिकमध्ये कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा नद्यांना पूर आला आहे. येथील गिरणा धरणातून सध्या ६० हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. काल रात्रीपासूनच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धरणातून २२५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यासाठी धरणाचे सहा दरवाजे चार फुटांनी उघडण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर मन्याड धरणातून ४५०० क्यूसेस व इतर नदी नाले असे मिळून गिरणा नदीत सुमारे ३० ते ३५ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गिरणा नदीला मोठा पुर आला आहे. प्रशासनाने खान्देशसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेने इशारा दिला आहे. एक तपानंतर गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून दोन महिन्यांपासून गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


याशिवाय, मनमाड शहरात रात्रीपासून पावसाचा हाहाकार सुरु आहे. येथील रेल्वे बंधारा आणि वागदर्डी धरण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पांझन आणि रामगुळणा नद्यांना पूर आला. नदीकाठी असणाऱ्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. तसेच येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडली आहे. यामुळे मदकार्यातही अनेक अडचणी येत आहेत.