संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण ओतणाऱ्या `या` शाहिरांना तुम्ही किती ओळखता?

Wed, 01 May 2024-11:17 am,

अनेक क्रांतिकारकांनी जसं त्यांच्या प्राणाची आहुती दिली त्याचप्रमाणे लोककलावंत आणि शाहिरांनी त्यांच्या शब्दांमधून आणि कलेतून समाजाला वेळोवेळी सत्याचा आरसा दाखवून दिला, याची इतिहास कायमच साक्ष देत आलाय. 

काट्याकुट्याचं आयुष्य जगणाऱ्या अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातून कायमच अन्यायाच्या विरोधातली बंडखोरी आणि संघर्षाची कहाणी व्यक्त होत आली. सांगलीच्या या शाहिराने मुंबईसह बेळगाव,विदर्भ आणि सीमाभागातील अनेक छोटी मोठी गावं महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी राज्यातल्या तळागाळातील लोकांना आपल्या शाहिरी बाण्याने लढण्यासाठी प्रेरित केलं. 

डफलीवर थाप मारून "माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली"... हे काव्य विवाहित जोडप्याच्या विरहाप्रमाणेच राजकिय डावपेचांना बळी पडलेल्या प्रत्येकाला बंड पुकारण्यास प्रेरित केलं. अण्णा भाऊंच्या जीवनाचा प्रवास कायमच खडतर होता. ते साहित्यिक असण्याबरोबरच क्रांतिकारी चळवळीचे कार्यकर्ते देखील होते. अण्णा भाऊंच्या धारदार लेखणीने स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी समाजाला एकजुटीने लढण्यास प्रेरणा दिली.

महाराष्ट्राची लोकधारा या कलाप्रयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे लोककलावंत शाहीर साबळे यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावं यासाठी मोलाचं योगदान दिलं होतं. कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे हे कलेतून केवळ मनोरंजन नाही तर समाज प्रबोधन करण्यास अग्रेसर असत.   

शाहीर साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला होता. कळत्या वयात त्यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव पडल्याने शाहीर बऱ्याच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. गोवा हैदराबाद मुक्ती संग्राम,1942 मधील 'चले जाव चळवळ' आणि स्वतंत्र महाराष्ट्रात मुंबई शहर विलीन होण्यासाठीच्या चळवळीत त्यांनी समाज प्रबोधन केले होते. 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे 'महाराष्ट्र अभिमान गीत' लिहणारे शाहीर साबळे यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचं योगदान आहे.   

छत्रपती शिवरायांचा पराक्रम पोवाड्यातून सादर करणारे लोकशाहीर अमर शेख म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं क्रांतिकारी रत्न होतं. अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले अमर शेख यांना जन्मतः परिस्थितीशी संघर्ष करण्याचं बाळकडू मिळालं होतं. त्यांची आई जात्यावर ओवी गात असे उर्दू आणि मराठी  मिश्रित ओव्या त्यांच्या आई राचायच्या त्यामुळेच शाहीर शेख यांना लोकसंगीताची आवड निर्माण झाली. गवाणकर, अण्णा भाऊ आणि अमर शेख या तिन्ही शाहिरांनी लोककलेतील त्रिकुट मानलं जातं. या त्रिकुटाने स्वतंत्र महाराष्ट्र राज्यासाठी गावखेड्यात जाऊन लोककलेच्या माध्यमातून क्रांतिकारी चळवळ उभी केली.   

पोवाडा, भारुड तमाशा आणि नाटक यामाध्यमातून त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यासाठी सामाजाच्या मनात क्रांतिकारी बीजं पेरण्यास सुरुवात केली. शाहिरांच्या या मोलाच्या योगदानाला जेष्ठ श्रेष्ठ साहित्यिक प्र. के.अत्रे यांनी कायमच प्रोत्साहन दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमर शेख यांचा सक्रिय सहभाग होता. कलेच्या माध्यमातून होणारं समाज प्रबोधन आणि त्यातून पेटून उठणारी जनता हे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होण्यास कारणीभूत ठरलं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link