9999 कोटी 94 लाख 95 हजार 999 रुपये..; शेतकऱ्याच्या खात्यावरील बॅलेन्स पाहून अधिकारीही थक्क
उत्तर प्रदेशमधील बदोई जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या खात्यावर चक्क 9900 कोटी रुपये जमा झाले. तुमच्या खात्यावर 9900 कोटी जमा झाल्याचा मेसेज पाहून त्याला धक्काच बसला.
ज्या व्यक्तीबरोबर हा प्रकार घडला त्याचं नाव भानू प्रकाश असं आहे. त्याने उत्तर प्रदेशमधील बरोडा युपी बँकेतील खातं तपासून पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या खात्यावर तब्बल 99,99,94,95,999.99 रुपये असल्याचं दाखवण्यात आलं. त्याने यासंदर्भातील माहिती तातडीने बँक अधिकाऱ्यांना दिली.
बँकेला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी भानू प्रकाशचं खातं हे किसान क्रेडिट कार्ड कर्जासंदर्भातील खातं असल्याचं जाहीर केलं. हे खात नॉन-परफॉर्मिंग असॅट म्हणजेच निष्क्रीय झाल्याचंही बँकने सांगितलं. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत बँकेनेच हे खातं निष्क्रीय केलं.
बँकेचे व्यवस्थापक रोहित गौतम यांनी नेमका काय गोंधळ झाला हे समजून सांगितलं. सॉफ्टवेअरमधील गोंधळामुळे या खात्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वळवण्यात आल्याची आकडेवारी सिस्टीममध्ये दिसू लागली.
बँकेने भानू प्रकाश यांना खात्यावर दिसत असलेली रक्कम सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे दिसत असल्याचं सांगितलं. निष्क्रीय खात्यांसंदर्भातील अपडेट दरम्यान हा गोंधळ घडला.
या खात्यावर दिसणारी रक्कम एवढी मोठी होती की बँकेने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि हे खातं तात्पुरतं ब्लॉक केलं. अशी घटना घडल्यास बँक नेमकं काय करते हे सुद्धा गौतम यांनी समजवून सांगितलं.
जी खाती एनपीएअंतर्गत जाहीर केली जातात त्या खात्यांशीसंबंधित बचत खात्यांवरील व्यवहारांवर बँका व्यवहाराचे निर्बंध घालते. या खात्यांवरुन मर्यादीत रक्कमच काढता येते. या खात्यासंदर्भातील अधिक अचडणी निर्माण होऊन गुंतागुंत होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय या हेतूने ही कारवाई केली जाते.
बँकेने भानू प्रकाश यांना ही सारी तांत्रिक बाब समजावून सांगितली आणि काय कारवाई केली हे सांगितल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात कोणतीही तक्रार नसल्याचं स्पष्ट केलं. (सर्व फोटो - प्रातिनिधिक)