पुणे: शिवसेना-भाजप युतीला आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर उपरोधिकपणे भाष्य करताना पवार यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत युतीला ४५ नव्हे तर ४८ जागा मिळतील. 
शिवसेना आणि भाजप यांच्याकडून युतीची घोषणा झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही ४५ जागांवर विजयी होऊ, असा दावा केला होता. या दाव्याची पवारांनी उपरोधिकपणे खिल्ली उडविली. तसेच शिवसेना आणि भाजप या दोघांनाही सत्तेच उब सोडायची नसल्याचेही पवार यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आणि भाजपच्या युतीवर अखेर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. त्यानुसार शिवसेना-भाजप लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका एकत्रितरित्या लढतील. लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ आणि भाजप २५ जागांवर लढेल. तर विधानसभा निवडणुकीत घटकपक्षांना जागा दिल्यानंतर शिवसेना-भाजप समसमान जागांवर लढतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान, शिवसेना-भाजपची युती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. गेल्या साडेचार वर्षात भाजपशी असलेल्या दुराव्यामुळे शिवसेना विरोधकांसारखीच वागत होती. त्यामुळेच विरोधकांच्या जागेवर शिवसेनेने अतिक्रमण केले होते. मात्र, आता शिवसेनेने भाजपशी युती केल्याने विरोधकांना ही जागा व्यापता येणार आहे. युती झाली नसती तर भाजपाविरोधातील मते शिवसेनेला मिळाली असती, तिच मते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळतील, अशी आशा आघाडीच्या नेत्यांना आहे.