अभ्यंगस्नान ही केवळ परंपरा नाही तर त्यामागे आहे शास्त्रीय कारण, जाणून घ्या मुहूर्त आणि फायदे
Diwali 2023 Abhyanga Snan: दिवाळीत अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. अभ्यंगस्नानाचे अनेक फायदेही आहेत.
Diwali 2023 Know Importance Of Abhyanga Snan: हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी यमराज आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तसंच, दिवाळीचा पहिला दिवस म्हणून अभ्यंग स्नानाचीही प्रथा आहे. नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. यंदा 12 नोव्हेंबर 2023 रोजी नरकचतुर्दशी आहे. अभ्यंग स्नानाचे आरोग्यासाठी फायदे आणि मुहूर्त याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (Abhyanga Snan Benefits)
नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाने हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा दिवशी यमदेवाचाही दिवस असतो त्यामुळं शरीराला नवीन रुप मिळते, अभ्यंग स्नाना केल्यामुळं यमराज व्यक्तीला रूप व सौंदर्य प्रदान करतात. ज्यामुळं शरीराला अनेक प्रकारचे लाभ मिळतात व ताण दूर होतो आणि मनदेखील शांत राहते,अशी धार्मिक मान्यता आहे.
अभ्यंगस्नान कसे कराल?
हिंदूशास्त्रानुसार, नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी उटणं लावून स्नान केले जाते. उटणं हे आयुर्वेदिक असते ज्यामध्ये हळद, दही, बेसन,चंदन आणि औषधी वनस्पती लावल्या जातात. हे उटणं शरीराला लावून नंतर कोमट पाण्याने स्नान केले जाते.
आरोग्यासाठी फायदे
उटणं हे आयुर्वेदिक घटकांपासून बनवले जाते. त्यामुळं त्वचेवर त्याचा काहिच दुष्परिणाम होत नाही. नैसर्गिक घटक असल्यामुळं त्वचेचा पोतही सुधारतो. पण अभ्यंगस्नान हे ब्राह्म मुहूर्तावरच करावे. पहाटे पाच ते सकाळी 7च्या दरम्यान केले जाते. या दरम्यान वातावरणात वात जास्त प्रमाणात असतो व शरीरातही वाताचे प्रमाण जास्त असते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्याने शरीराला फायदे होतात.
अभ्यंगस्नानाच्यावेळी उटणं लावायच्या आधी तिळाच्या तेलाने मॉलिश करावी. कारण तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते तसंच, त्वचादेखील मऊ राहते. त्यानंतर आयुर्वेदिक घटकांनी बनवलेले उटणं शरीराला लावले जाते. उटणहे थोडे जाडसर असल्याने ते शरीरावर लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होते. शरीरावरील मृत त्वचा निघून जाते आणि नवीन पेशी तयार होतात. उटणं हे नैसर्गिक स्क्रब म्हणूनही तुम्ही वापरु शकता.
थंड हवामानामुळं त्वचा कोरडी पडते अशावेळी उटण्याने अंघोळ केल्यास त्वचा मऊ आणि उजळते. गरज असल्यास तुम्ही उटण्यात गुलाबाच्या पाकळ्या, केशर किंवा संत्र्याच्या सालीची पावडरदेखील टाकू शकता.
उटण्याचा वापर कसा कराल?
तुमच्या त्वचेच्या पोतनुसार तुम्ही उटण्याचा वापर करु शकता. त्वचा तेलकट असेल तर त्यात कच्चे दूध आणि पाणी टाकू शकता. त्वचा कोरडी असेल तर उटण्यात दूधासोबतच मध वापरा त्यामुळं त्वचा मऊ होईल.
अभ्यंगस्नानाचा मुहूर्त
यंदा अभ्यंग स्नानाचा मुहूर्त 05.28 am - 06:41 मिनिटांपर्यंत सांगण्यात आला आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)