Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी कधी आहे? पूजा विधी, मुहूर्त आणि पूजन सामग्रीबाबत जाणून घ्या
उदयतिथीनुसार गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला असणार आहे.
Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया..अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सोहळा येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात गणपती उत्सवासाठी लगबग सुरु झाली आहे. गणपतीची मूर्ती, मखर, सजावट यासाठी भक्तांची धावपळ सुरु आहे. हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोक गणपतीची प्रतिष्ठापना करतात. घरगुती गणपती दीड, पाच, गौरी गणपती आणि दहा दिवसांचा असतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शक्यतो दहा दिवसांचा उत्सव साजरा करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापणा केली जाते. पंचांगानुसार, 30 ऑगस्टला चतुर्थी प्रारंभ तिथी दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनी मुहूर्त सुरु होईल आणि 31 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 22 मिनिटांनी तिथी संपेल. मात्र उदयतिथीनुसार गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला असणार आहे.
गणपती प्रतिष्ठापना पूजा साहित्य
गणपतीचा मूर्ती
हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध
कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध,
कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुटे पैसे
कापसाची वात, चार लहान वाट्या, चंदन, दूर्वा
2 नारळ, 5 फळे, 25 विड्याची पाने
10 सुपारी, 5-5 खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड
रेशीम कापड, कापसाची वस्त्रे, 2 जानवी जोड, 1 पंचा,
तांदूळ, तुळस, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार, आंब्याच्या डहाळे
चौरंग, आसन, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरंजन, कापूर
हात पुसण्यासाठी फडके, देवाचे अंग पुसण्यासाठी कापड
अशी कराल गणपतीची पूजा
गणेश चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करून नित्य पूजा करावी
गणेश मूर्ती असलेली जागा स्वच्छ करून घ्यावी
पाटावर अक्षता मांडून त्यावर मूर्ती स्थापन करावी
'श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये' असा संकल्प म्हणून पाणी सोडावं
कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं
गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी स्पर्श करावा
मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेसाठी खालील मंत्र म्हणावा
अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च।
अस्यै देवत्वम् आचार्यै मामहेति च कश्चन।।
रक्तांभीधिस्थ पोतोल्ल सदरुण सरोजाधि रुढाकराब्जै:।
पाशम् कोदंड भिक्षूद्भवमथ गुणमप्यम् कुशम् पंचबाणान्।।
बिभ्राण असृक्कपालम् त्रिनयन लसिता पीनवक्ष ऊरुहाढ्या।
देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती: परा न:।।
गणपतीला मनापासून नमस्कार करावा आणि पुढील मंत्र म्हणावा…
एकदंतम् शूर्पकर्णम् गजवक्त्रम् चतुर्भुजम्।
पाशांकुशधरम् देवम् ध्यायेत सिद्धिविनायकम्।।
ध्यायेत देवम् महाकायम् तप्तकांचन संनिभम्।
चतुर्भुजम् महाकायम् सर्वाभरणभूषितम्।।
दंताक्षमाला परशुपूर्ण मोदक हस्तकम्।
मोदकासक्त शुंडाग्रम् एकदंतम् विनायकम्।।
अंत:करणात गणेशाचं ध्यान करून आवाहन मंत्र म्हणावा…
आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।
गणपतीच्या पायांवर फुलानं पाणी अर्पण करून अर्घ्य मंत्र म्हणावा…
अर्घ्यम् च फलसंयुक्तम् गंधपुष्प आक्षतैर्युतम्।
गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। अर्घ्यम् समर्पयामि।।
पळीभर पाण्यात गंध, अक्षता, पुष्प व सुपारी ठेवून त्यातले पाणी फुलानं गणपतीला अर्पण करावे. नंतर पंचामृत स्नान मंत्र म्हणावा…
पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्।
पंचामृतेन स्नपनम् प्रियताम् परमेश्वर।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पंचामृत स्नानम् समर्पयामि।।
पंचामृत म्हणजे दूध, दही, तुप, साखर आणि मध एकत्र करून ते फुलानं गणपतीला अर्पण करावं. अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा.
गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्राघनाशन।
एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन।।
विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक।
कुमारगुरवे नित्यम् पूजनीया: प्रयत्नत:।।
हे मंत्र म्हणून 21 दुर्वा गणपतीला अर्पण कराव्या. गणपतीची आरती करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. यावेळी खालील मंत्र म्हणावा….
नैवेद्यम् गृह्यताम् देव भक्तिम् मेह्यचलाम् कुरु।
ईप्सितम् मे वरम् देहि परत्र च पराम् गतिम्।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। नैवेद्यम् समर्पयामि।।
पुढील मंत्र म्हणून गणपतीसमोर साष्टांग नमस्कार घालावा.
नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे।
साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।।
गणपती आपल्या घरी असेपर्यंत दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. तसेच रोज दुपार संध्याकाळ नैवेद्य दाखवावा.
गणेश चतुर्थी 2022 चंद्रोदय वेळ
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई आहे. या दिवशी चंद्र सकाळी 09:26 वाजता उगवेल. या दिवशी चंद्र पाहिल्याने खोटा कलंक लागतो, अशी मान्यता नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)