How To Perform Puja At Home On Ramlala Pran Pratishtha Day : अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहे. देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. प्रत्येकाला अयोध्येत जाऊन रामाचं स्वागत करता येणार नाही. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, हवन, भंडारा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहे. याशिवाय राम भक्तांना त्यांच्या घरी प्रभू रामाची पूजा करून पुण्य प्राप्त करता येऊ शकतं असं पंडित सांगतात. या दिवशी प्रत्येक घरात राम ज्योती प्रज्वलित होणार आहे. अशावेळी घरात राहून रामाचं स्वागत आणि पूजा कशी करावी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (How To Perform Puja At Home On Ramlala Pran Pratishtha Day 22 January rituals and Puja Sahitya)



तुमच्या घरी रामलल्लाची मूर्ती नसेल तर 22 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर नवीन मूर्ती घरी आणा. त्यानंतर अभिजीत मुहूर्तावर तुमच्या घरातील मंदिरात रामलल्लाचा अभिषेक करुन पूजा करा. नवीन मूर्तीच्या अभिषेकासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे कारण त्याच वेळी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाचा अभिषेकही करण्यात येणार आहे. मूर्तीची स्थापना केल्यानंतर, मूर्तीमध्ये दैवी उपस्थितीला आमंत्रित करण्यासाठी मंत्रांचं पठण नक्की करा. 


22 जानेवारी 2024 अभिजीत मुहूर्त -  12:11:32 पासुन 12:54:04 पर्यंत


हेसुद्धा वाचा - Ayodhya Ram mandir : तुम्हालाही अयोध्येसाठी निमंत्रण पत्रिका व अक्षता मिळाल्यात? मग त्या तांदळाचं काय करायचं?


पूजेसाठी हे साहित्य


सुपारी, उप मणिबंध (कलावा), कुंकू, अक्षता (तांदूळ), गंगाजल, तांब्याच्या पेल्यात जल, श्रीरामाची प्रतिमा, शुद्ध तूप, धूप अगरबत्ती, चंदन, फुले, फळे, मिठाई, कापूर, घंटी, पूजा थाळी, अगरबत्ती


रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणेच्या दिवशी घरी पूजा कशी करावी?


22 जानेवारीला सकाळी लवकर उठून प्रभू रामाचं स्मरण करुन लवकर आंघोळ करा. शक्य असल्यास पिवळे, भगवे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करा. नंतर पूजास्थान स्वच्छ करा, गंगाजल शिंपडून शुद्ध करा. पूजास्थळ उत्तर आणि पूर्व दिशेचा मध्यभाग म्हणजे घरातील ईशान्य कोपर्‍यात असावं हे लक्षात ठेवा. ईशान्य भाग शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. येथे छोटेखानी देव्हारा असावा. पूजास्थळावरून जुनं सामान, शिळी फुलं, फुलमाळा काढून टाका. आता देव्हार्‍यातील सर्व देव धुवा. प्रतिमा पुसून घ्या. स्वच्छ वस्त्रे धारण करुन घ्या. आता पाटावर किंवा चौरंगावर लाल कापड परिधान करा. त्यावर श्रीरामाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा. एक लक्षात ठेवा प्रतिमा किंवा मूर्ती ही पूर्वाभिमुख असावी. 


पूजा करण्यापूर्वी हातात जल घेऊन पूजेचा संकल्प सोडावा. मूर्तीला जलाभिषेक करुन पंचामृताने न्हाऊ घाला. रोळी अखंड फुले अर्पण करा. तुपाचा दिवा लावावा. धूपबत्ती, अगरबत्ती चेतवावी. कुंकू, अक्षता, चंदन, फुल, फळं, मिठाई, पंचामृत, खीर रामाला अर्पण करावी. शेवटी कापूर पेटवावा आणि आरती करावी. हे लक्षात ठेवा की भगवान श्रीराम सोबतच हनुमानजींचीही पूजा करा. यानंतर हनुमान चालीसा, रामचरितमानस किंवा किमान सुंदरकांड पाठ नक्की करा. शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करा.


 



पूजेनंतर घरामध्ये कापूर आणि तुपाचा दिवा लावा


या खास दिवशी कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरू द्या. यासोबतच संध्याकाळी संपूर्ण घरात दिवे लावून दिवाळी साजरी करावी. या दिवशी संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा नक्की लावा. हे भगवान श्रीरामाच्या आगमनाचं प्रतीक मानलं गेलं आहे.


रामलल्लाची पूजा केल्याने लाभ ?


रामलल्लाची पूजा केल्याने प्रभू राम, माता सीता आणि हनुमानजी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. प्रत्येक कामात यश मिळतं आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)