मकर संक्रांत शुभ की अशुभ
यावर्षी रविवार दि. १४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत आहे.
मुंबई : यावर्षी रविवार दि. १४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत आहे.
या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ त्याच दिवशी दुपारी १-४६ पासून सूर्यास्तापर्यंत आहे. मकर संक्रांतीचा आणि १४ जानेवारीचा तसा काहीही संबंध नाही. असे पंचांगकर्ते खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येणार आहे. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. अशारितीने दिवस पुढे जात सन ३२४६ मध्ये निरयन मकरसंक्रांती १ फेब्रुवारीला येणार आहे.
सूर्याने २१ डिसेंबर रोजी जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश केला त्या दिवसापासूनच आपल्याइथे दिनमान वाढू लागले. उत्तरायणारंभ झाला. मकर संक्रांतीपासून दिनमान वाढत जाते . “ मकरसंक्रांती अशुभ असते “ असे जे म्हटले जाते ते चुकीचे आहे. दिनमान वाढत जाणे हे अशुभ कसे असू शकेल ? वर्षभरात ज्यांच्याशी मतभेद किंवा भांडण झाले असेल त्यांना या दिवशी तिळगूळ देऊन गोड बोलण्यासंबंधी सांगितले जाते. मकरसंक्रांती पुण्यकाळात गरीबांना , गरजू लोकांना दान देण्यास सांगण्यात आले आहे.
मकरसंक्रांतीला काळे वस्त्र नेसण्याची पद्धत आहे. काळ्या रंगाची वस्त्रे या थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवतात. पतंग उडवून दिनमान वाढत जाण्याचे स्वागत केले जाते. मात्र आकाश हे पक्षांचेही असते ही गोष्ट लक्षात घ्यावी. धारदार मांज्याचा वापर टाळावा. पुढच्यावर्षी मकर संक्रांती १५ जानेवारी २०१९ रोजी येणार असल्याचेही श्री. सोमण यांनी सांगितले.