मुंबई : इंग्रजी नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रात. यंदा 15 जानेवारी 2019 रोजी मकर संक्रांत हा सण आला आहे. सक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालून हा सण साजरा केला जातो. हा सण प्रत्येक जण आवडीने साजरा करत असतो. या दिवशी नववधू आणि बाळाची पहिली संक्रांत अगदी उत्साहाने साजरी केली जाते. हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा केला जातो. 'तिळ गूळ घ्या, गोड गोड बोला' असं म्हणतं सगळ्यांना तिळाचे लाडू आणि हलवा देऊन हा सण साजरा केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.


संक्रांतीच्या दिवशी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली, अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात. नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला ‘आवा लुटणे’ असे म्हणतात.


भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो, मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरूष काळ्या रंगाचा कुर्ता पायजामा परिधान करीत असतात. सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांतीपासून सूर्य मकरराशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे. 


Image Source - Sayali Rajadhyaksha Facebook Page