PM Modi 11 Day Anushthan: अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेमध्ये सहभागी होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ऑडिओ संदेशात 22 जानेवारीच्या त्या अद्भूत क्षणाचा साक्षीदार होणार आहोत ज्याची वाट संपूर्ण जग पाहत आहे. पंतप्रधानांनी प्राणप्रतिष्ठापणनेच्या 11 दिवस आधीपासूनच विशेष अनुष्ठान करणार आहे. एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रमाणे मोदी हे व्रत करणार आहेत. माझ्या भावना मला शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण आहे. मात्र मी माझ्याकडून एक प्रयत्न केला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.


मी व्रत करणार आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रांमध्ये देवाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापणा एक विशद प्रक्रिया आहे. प्राणप्रतिष्ठापणेसंदर्भातील हे नियम मूळ कार्यक्रमाच्या अनेक दिवसांआधीपासूनच पाळावे लागतात. एका रामभक्त म्हणून पंतप्रधान मोदी राममंदिराच्या निर्माणामध्ये आणि प्राणप्रतिष्ठापणेसाठी एक अध्यात्मिक साधनेच्या माध्यमातून भावना प्रकट करत आहेत. आपली सर्व कामं आणि जबाबादऱ्या पार पाडताना प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आणि त्यापूर्वी सर्व नियम आणि तपश्चर्यांचं पालन दृढपणे करणार आहे. शास्त्रांमध्ये जसा उल्लेख आहे तसेच मी हे व्रत करणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. मोदींनी 11 दिवसांसाठी या नियमांचं पालन सुरु केलं आहे.


कठोर तपश्चर्या


देवाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापणा करणे ही एक ईश्वरीय चेतनेचा संचार त्या प्रतिमेत करण्याचं अनुष्ठान आहे. यासाठी शास्त्रामध्ये अनुष्ठानाआधीच्या व्रताचे नियम निर्देशित केले आहेत. त्यानुसार पंतप्रधान मोदी आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये ब्रम्हमुहूर्त जागरण, साधना आणि सात्विक आहारासारख्या नियमांचं पालन अगदी आजही करतातच. मात्र पुढील 11 दिवस मोदींनी कठोर तपश्चर्या करण्याचं व्रत घेतलं आहे.


22 जानेवारीची ओढ


पंतंप्रधानांनी शेअर केलेल्या ऑडिओची सुरुवात ते 'राम-राम' म्हणून करतात. "आयुष्यातील काही क्षण हे इश्वराच्या आशिर्वादामुळेच प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात. आज आपल्या सर्व भारतीयांसाठी, जगभरात पसरलेल्या रामभक्तांसाठी असाच पवित्र क्षण आहे. सगळीकडे प्रभू श्रीरामाच्या भक्तीचं अद्भूत वातावरण दिसत आहे. चारही दिशांना राम नामाचा जयघोष होत आहे. राम भजनामध्ये अद्भूत सौंदर्य आणि माधुर्य आहे. प्रत्येकाला आता त्या ऐतिहासिक क्षणाची म्हणजेच 22 जानेवारीची ओढ लागली आहे. अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी केवळ 11 दिवस शिल्लक आहेत. माझं सौभाग्य आहे की मला या पुण्यवान क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे," असं मोदी म्हणाले.



नाशिक धाम-पंचवटीमधून सुरुवात


"आध्यात्मिक प्रवासातील काही तपस्वी आणि महापुरुषांकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार... त्यांनी सुचविलेल्या यम-नियमांनुसार मी आजपासून 11 दिवसांचा विशेष अनुष्ठान सुरू करत आहे. या पवित्र प्रसंगी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. ऋषी, महर्षी आणि तपस्वींच्या सद्गुणांचे स्मरण करतो. भगवंताचेच एक रूप असलेल्या लोकांकडे मी प्रार्थना करतो की, मला आशिर्वाद द्या. मनाने, शब्दांनी आणि कृतीतून माझ्याबाजूने कसलीही कमतरता पडू नये यासाठी आशिर्वाद द्या. मित्रांनो, मी भाग्यवान आहे की, मी नाशिक धाम-पंचवटी येथून माझ्या 11 दिवसीय अनुष्ठानाची सुरुवात करत आहे. पंचवटी ही पवित्र भूमी आहे जिथे भगवान श्रीराम बराच वेळ वास्तव्यास होते. आज माझ्यासाठी अगदी आनंदाची बाब आणि योगायोग आहे की आजच स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. स्वामी विवेकानंदजींनीच हजारो वर्षांपासून हल्ला होत असलेल्या भारताच्या आत्म्यावर फुंकर मारली," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.



शाश्वत सृष्टीचा तो चैतन्यमय क्षण


"आज तोच आत्मविश्वास भव्य राम मंदिराच्या रूपाने आपली ओळख सर्वांसमोर आहे. आजच्या सोहळ्यातील खास बाब म्हणजे आज माता जिजाबाईंची जयंती आहे. माता जिजाबाई ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एका महान व्यक्तीला जन्म दिला. आज आपण भारताला ज्या अखंड रूपात पाहतो त्यामध्ये माता जिजाबाईंचे खूप मोठे योगदान आहे. मित्रांनो, जेव्हा मी माता जिजाबाईंच्या सद्गुणांचे स्मरण करत असतो तेव्हा मला माझ्या आईची आठवण येणे खूप साहजिक असते. माझी आई आयुष्याच्या शेवटपर्यंत जपमाळ जपताना सीता आणि राम यांचे नामस्मरण करत असे. मित्रांनो, प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त… शाश्वत सृष्टीचा तो चैतन्यमय क्षण… अध्यात्मिक अनुभवाची ती संधी… त्या क्षणी गर्भगृहात काही घडणार नाही का…!!! मित्रांनो, शारीरिक रूपाने मी त्या पवित्र क्षणाचा साक्षीदार होईन पण माझ्या मनात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात 140 कोटी भारतीय माझ्या पाठीशी असतील. तुम्ही माझ्यासोबत असाल… प्रत्येक राम भक्त माझ्यासोबत असेल. जाणीवेचा तो क्षण आपल्या सर्वांसाठी एक सामुहिक अनुभव असेल. राममंदिरासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले अशा असंख्य व्यक्तींची प्रेरणा मी माझ्यासोबत घेईन," असं मोदी म्हणाले.