`भारत वर्ल्डकपची ट्रॉफी उचलू शकतो, पण एकच भीती की...`; डिव्हिलियर्सचं प्रामाणिक मत
AB de Villiers On India World Cup Squad: ए. बी. डिव्हिलियर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये भारताला विश्वचषक 2023 जिंकण्याची किती संधी आहे यासंदर्भात भाष्य केलं आहे.
AB de Villiers On India World Cup Squad: दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज ए. बी. डिव्हिलियर्सने भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पुढील महिन्यामध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाबद्दल बोलताना दक्षिण आफ्रिकेच्या या माजी स्फोटक फलंदाजाने स्तुतीसुमनं उधळली आहेत. भारत हा विश्वचषक जिंकणाऱ्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. मात्र त्याचवेळी ए. बी. डिव्हिलियर्सने भारतामध्ये खेळवल्या जात असलेल्या स्पर्धांचा विचार करता भारतीय संघाकडून फार जास्त अपेक्षा असतील असंही नमूद केलं आहे. 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 ला भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावलं होतं. हाच पराक्रम पुन्हा करण्याचा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा मानस असेल.
भारतात खेळवलेली विश्वचषक स्पर्भा भारतच जिंकला
भारताने 5 सप्टेंबर रोजी एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील अनुभवी आणि नव्या खेळाडूंचा समावेश असल्याने संघ संतुलित वाटत आहे. संघातील खेळाडूंच्या यादीवर नजर टाकल्यास ऑन पेपर भारतीय संघ फारच सक्षम वाटत आहे. मात्र मागील वेळेस म्हणजेच 2011 साली भारतात खेळवला गेलेला विश्वचषक कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. त्यामुळे यंदाच्या वेळेस तशीच कामगिरी करण्यासाठी खेळाडूंवर मोठा तणाव असेल असं मानलं जात आहे. मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंबरोबर खेळलेला आणि भारतीय संघाचा खेळ जवळून पाहिलेल्या ए. बी. डिव्हिलियर्सने हे मत व्यक्त केलं आहे.
हा संघ फारच शक्तीशाली
ए. बी. डिव्हिलियर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवर यासंदर्भातील विश्लेषणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात त्याने हा उल्लेख केला आहे. भारताचा संघ हा शक्तीशाली आहे मात्र घरगुती मैदानावर विश्वचषक स्पर्धा खेळण्याच्या तणावामुळे भारतीय संघाच्या कमागिरीवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यता ए. बी. डिव्हिलियर्सने व्यक्त केली आहे. "भारताचा संघ फारच उत्तम आहे. हा संघ फारच शक्तीशाली आहे. कर्णधार रोहित शर्मा असून उपकर्णधार हार्दिक पंड्या आहे," असं ए. बी. डिव्हिलियर्सने या व्हिडीओत म्हटलं आहे.
डिव्हिलियर्स वाटतेय ही एकच चिंता
"मला भारताबद्दल एकच चिंता वाटतेय ती म्हणजे भारत घरच्या मैदानावर खेळत आहे. मागील वेळेस विश्वचषक भारतात खेळवला गेला होता तेव्हा भारताने जेतेपद जिंकलं होतं. आता याचमुळे त्यांच्यावर फार दबाव असेल. माझ्या दृष्टीने हाच मोठा अडथळा वाटत आहे," असं ए. बी. डिव्हिलियर्स म्हणाला. मात्र त्यांना हा तणाव योग्य पद्धतीने संभाळता आला तर भारतीय संघ स्पर्धेमध्ये फार दूरपर्यंत मजल मारेल, असा विश्वासही ए. बी. डिव्हिलियर्सने व्यक्त केला आहे.
स्पर्धेचे विजेते म्हणून विश्वचषक उचलतील
"त्यांनी न घाबरता खेळ केला पाहिजे. हेच अनेकांचं मत आहे. देशाच्या अपेक्षांमुळे असणारा तणाव घेता कामा नये कारण ती गोष्ट खेळाडूंच्या नियंत्रणात नसते. त्याऐवजी खेळाडूंचं ज्याच्यावर नियंत्रण आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. भारतीय संघाने दबावाची चिंता न करता अगदी न घाबरता खेळलं पाहिजे. त्यांना हे जमलं तर ते फार दूरपर्यंत जातील या स्पर्धेत. कदाचित तेच स्पर्धेचे विजेते म्हणून विश्वचषक उचलतील," असंही ए. बी. डिव्हिलियर्सने सांगितलं.
सूर्य़कुमारबद्दलही बोलला
ए. बी. डिव्हिलियर्सने सूर्युकमार यादववरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. "स्कायला विश्वचषकाच्या संघात पाहून मला आनंद झाला आहे. तुम्हाला ठाऊक आहे की मी त्याचा मोठा पाठीराखा आहे. तो खरं तर मी ज्या पद्धतीने टी-20 क्रिकेट खेळायचो तसाच खेळतो. त्याला आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारसं यश मिळालेलं नाही. मात्र हा फार छोटा खेळ आहे. माइंड स्विच करणं ज्याला जमतं तो यशस्वी ठरतो. हे असं माइंड स्विच करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. मला अपेक्षा आहे की त्याला एकदिवसीय विश्वचषकाच्या स्पर्धेत अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळेल. असं झालं तर भारत विश्वचषक जिंकण्याची शक्यता नक्कीच अधिक असेल," असं ए. बी. डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.