सूरत : भारताकडून टेस्ट आणि वनडे मॅच खेळणाऱ्या कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने अनोखा विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मिथुनने हरियाणाच्या ५ बॅट्समनना एकाच ओव्हरमध्ये आऊट केलं. मिथुनच्या या कामगिरीमुळे कर्नाटकने हरियाणाचा ८ विकेटने पराभव केला. याच मॅचमध्ये केएल राहुलने ६६ रनची खेळी केली. या विजयासोबतच कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणाने पहिले बॅटिंग करताना १९४/८ एवढा स्कोअर केला. हिमांशू राणाने ६१ रन, चैतन्य विश्णोईने ५५ आणि हर्षल पटेलने ३४ रन केले. हरियाणाने शेवटच्या ओव्हरमध्ये ५ विकेट गमावल्या. कर्नाटकने फक्त १५ ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १९५ रन केल्या. देवीदत्त पडिकल ८७ रन आणि केएल राहुलने ६६ रन तर अभिमन्यू मिथुनने ३९ रन देऊन ५ विकेट घेतल्या.


अभिमन्यू मिथुनने शेवटच्या ओव्हरमध्ये ५ विकेट घेतल्या. त्याने पहिल्या बॉलला हिमांशू राणा, दुसऱ्या बॉलला राहुल तेवतिया, तिसऱ्या बॉलवर सुमीत कुमार, चौथ्या बॉलवर अमित मिश्राला आऊट केलं. ओव्हरचा पुढचा बॉल हा वाईड होता, यानंतर पाचव्या बॉलला एक रन गेली आणि सहाव्या बॉलला जयंत यादवची विकेट गेली.


अभिमन्यू मिथुनने याआधी त्याच्या वाढदिवसाला विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामीळनाडूविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्या मॅचमध्येही मिथुनने ५ विकेट घेतल्या होत्या. यावेळी पुन्हा एकदा मिथुनने हॅट्रिक घेतली. मिथुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही हॅट्रिक घेतली होती.


३० वर्षांच्या मिथुनने भारताकडून ४ टेस्ट आणि ५ वनडे मॅचही खेळल्या आहेत. मिथुनने टीम इंडियासाठी २०१० साली पहिली आणि २०११ साली शेवटची मॅच खेळली. यानंतर तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे.