कार्तिकच नाही तर या खेळाडूंनीही सिक्स मारून टीमला जिंकवलं
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
कोलंबो : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला. दिनेश कार्तिक हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या बॉलला ५ रन्सची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकनं ८ बॉल्समध्ये २९ रन्सची स्फोटक खेळी केली. कार्तिकच्या या इनिंगमध्ये ३ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता. शेवटच्या बॉलवर सिक्स मारून टीमला जिंकवून देणारा कार्तिक हा पहिला खेळाडू नाही. याआधी ६ खेळाडूंनी हा कारनामा करुन दाखवला आहे.
जावेद मियादाद
१९८६ साली जावेद मियादादनं चेतन शर्माला शेवटच्या बॉलवर सिक्स मारून पाकिस्तानला जिंकवलं. या मॅचमध्ये पाकिस्तानला विजयासाठी २४६ रन्सनं आव्हान भारतानं दिलं होतं. शेवटच्या बॉलला ४ रन्सची आवश्यकता असताना मियादानं शर्माला सिक्स मारली.
शिवनारायण चंद्रपॉल
वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलनंही सिक्स मारून टीमला विजयी केलं आहे. २००८ साली श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये चंद्रपॉलनं हा कारनामा केला. मॅचच्या शेवटच्या बॉलवर वेस्ट इंडिजला विजयासाठी ६ रन्सची आवश्यकता होती. चामुंडा वासच्या बॉलिंगवर चंद्रपॉलनं सिक्स मारून वेस्ट इंडिजला जिंकवून दिलं.
इओन मॉर्गन
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20 मॅचमध्ये इओन मॉर्गनननं सिक्स मारून इंग्लंडला जिंकवलं. इंग्लंडला शेवटच्या बॉलमध्ये ३ रन्सची आवश्यकता असताना मॉर्गननं अशोक डिंडाच्या बॉलिंगवर सिक्स मारली. इंग्लंडनं ४ विकेट गमावून १८१ रन्स बनवून ही मॅच जिंकली.
लान्स क्लूसनर
२६ मार्च १९९९ला दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लूसनरनं न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलला सिक्स मारून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ११ रन्सची आवश्यकता होती. पहिल्या ५ बॉलमध्ये क्लूसनर आणि बाऊचरला ५ रन्स करता आल्या. यानंतर डिऑन नॅशच्या शेवटच्या बॉलवर क्लूसनरनं सिक्स मारली.
ब्रेंडन टेलर
२००६ साली हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वे आणि बांग्लादेशच्या वनडे मॅचमध्ये ब्रेंडन टेलरनं सिक्स मारून झिम्बाब्वेला जिंकवलं. शेवटच्या तीन बॉलमध्ये झिम्बाब्वेला विजयासाठी १६ रन्सची आवश्यकता होती. टेलरनं मुर्तजाच्या चौथ्या बॉलवर फोर तर पाचव्या बॉलवर सिक्स मारली. आता झिम्बाब्वेला शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी ६ रन्सची आवश्यकता होती. या बॉलवरही ब्रेंडन टेलरनं सिक्स मारून झिम्बाब्वेला जिंकवलं.