मुंबई: भारताच्या अंडर-१९ संघाचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याला आगामी विनू मंकड चषकासाठी मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. येत्या ६ ऑक्टोबरला मुंबई गुजरातविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळण्याच्यादृष्टीने या स्पर्धेतील अर्जूनची कामगिरी महत्वपूर्ण ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अंडर-१९ संघात अर्जूनला संधी मिळाली होती. मात्र, त्यावेळी अर्जूनला आपली फारशी छाप पाडता आली नव्हती. दोन सामन्यांमध्ये त्याने केवळ तीनच बळी टिपले होते. 


यानंतर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत मात्र अर्जूनला १९ वर्षे पूर्ण झाल्यामुळे संघातून वगळण्यात आले होते. कारण २०२० साली होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकात अर्जून तेंडुलकर खेळू शकणार नाही. परिणामी सध्या सुरु असलेल्या आशिया कप स्पर्धेसाठीही त्याचा विचार करण्यात आला नाही. 


त्यामुळे अर्जूनला मुंबईच्या वरिष्ठ संघात सामील होण्याचे वेध लागले होते. मात्र, वरिष्ठ संघाच्या नुकत्याच झालेल्या सराव शिबिरात अर्जूनचा समावेश करण्यात आला नव्हता. याउलट सात नव्या खेळाडुंना संधी देण्यात आली होती. 


या सगळ्या पार्श्वभूमीवर विनू मंकड चषकात अर्जूनला स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी चालून आली आहे. त्यामुळे अर्जून ही संधी साधणार का, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.