Asia Cup 2022: भारतीय हॉकी संघाने 2-1 ने जपानचा उडवला धुव्वा
आशिया कप 2022 स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने जपानचा 2-1 असा पराभव केला.
मुंबई : आशिया कप 2022 स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने जपानचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह भारताने आशिया कप 2022 च्या सुपर-4 टप्प्यात विजयाने सुरुवात केली आहे. आता भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी मलेशियाशी होणार आहे.
आशिया कप 2022 मध्ये आज शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने जपानचा 2-1 असा पराभव केला. भारताकडून मनजीत (8वे मिनिट) आणि पवन राजभर (35वे मिनिट) यांनी गोल केले. त्याचवेळी, ताकुमा निवाने सामन्याच्या 18व्या मिनिटाला जपानसाठी एकमेव गोल केला.
विशेष म्हणजे साखळी सामन्यात जपानने भारताचा 5-2 असा पराभव केला होता. जपानने साखळी सामन्यातील तिन्ही सामने जिंकले होते आणि पूल-अ मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे चार गुण होते, परंतु गतविजेत्या भारताने अधिक चांगल्या गोल फरकामुळे पुढील फेरीत प्रवेश केला. आणि आता जपानविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने साखळी सामन्यातील पराभवाचाही बदला घेतला.
बीरेंद्र लाक्रा संघाचा कर्णधार
टीम इंडियाने या स्पर्धेत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. संघाचे नेतृत्व अनुभवी बिरेंदर लाक्राकडे आहे, तर सरदार सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.