ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या टेस्ट मॅचला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये उस्मान ख्वाजालाही संधी देण्यात आली आहे. पण उस्मान ख्वाजाचा भाऊ अर्सलान ख्वाजाला बनावट कागदपत्रांसह सिडनीमध्ये अटक करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मालकम टर्नबुल आणि अन्य खासदारांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या कटामध्ये सामील असल्याचा आरोप अर्सलान ख्वाजावर आहे. ऑगस्ट महिन्यात युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स ग्राऊंड्समध्ये सापडलेल्या कागदपत्रांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा प्लान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ऑस्ट्रेलियातल्या वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार ३९ वर्षांच्या अर्सलान ख्वाजाची एनएसडब्ल्यू पोलिसांनी मंगळवारी चौकशी केली. अर्सलानला जॉईंट काऊंटर टेररिझम टीमनं प्रश्न विचारले. ही कागदपत्र ऑगस्ट महिन्यात एनएसडब्ल्यू युनिव्हर्सिटीमधून जप्त करण्यात आली होती.



बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी एका श्रीलंकेच्या नागरिकाला अटक केल्यानंतर ३ आठवड्यांनी अर्सलानला अटक करण्यात आली. पण श्रीलंकेच्या नागरिकावर लागलेले हे आरोप चुकीचे सिद्ध झाले. मोहम्मद कामेर निलार निजामद्दीन पुन्हा श्रीलंकेला परतला. त्यानं गुलबर्न परमॅक्स जेलमध्ये ठेवण्यात आल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.


हस्ताक्षर तज्ज्ञांना निजामद्दीनच्या हस्ताक्षरामध्ये फरक जाणवला आणि त्यामुळे त्याच्यावर लागलेले आरोप फेटाळण्यात आले. एनएसडब्ल्यू युनिव्हर्सिटीच्या कंत्राटदारालाही दहशतवादी कारवायांसाठी बनावट कागदपत्र बनवल्यामुळे अटक करण्यात आली आहे. हा कंत्राटदारही ४ आठवडे जेलमध्ये होता. सप्टेंबरमध्ये त्याला सोडण्यात आलं.


या प्रकरणावर मी जास्त बोलू शकत नाही. पोलिसांची चौकशी सुरु आहे. याबद्दल माझं आत्ता बोलणं योग्य नाही. माझं आणि माझ्या कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यात दखल देऊ नका, असं उस्मान ख्वाजा पर्थ नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला.