मुंबई : भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने कॉफी विथ करणमध्ये झालेल्या वादावर अखेर मौन सोडलं आहे. आम्हा क्रिकेटपटू म्हणून असं काही होईल याची मला कल्पना नव्हती. बॉल माझ्या कोर्टात नव्हता तर दुसऱ्याच्याच कोर्टात होता. अशा परिस्थितीमध्ये मी स्वत:ला ठेवू इच्छित नव्हतो, असं हार्दिक पांड्याने सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल कॉफी विथ करण या करण जोहरच्या कार्यक्रमात गेले होते. या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवर बंदी घातली. ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून दोघांना भारतात परतावं लागलं.


बीसीसीआयने हार्दिक आणि राहुल यांच्याकडून २० लाख रुपयांचा दंड घेतला. तसंच दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी १-१ लाख रुपये १० पॅरा मिलट्री फोर्सच्या शहिद जवानांच्या पत्नींना द्यावे लागले. अंधांच्या क्रिकेटसाठी बनवण्यात आलेल्या फंडामध्येही राहुल आणि हार्दिकला प्रत्येकी १०-१० लाख रुपये द्यावे लागले.


हार्दिक-राहुलच्या या वादावर त्यावेळी करण जोहरने देखील प्रतिक्रिया दिली होती. मी त्या दोघांना माझ्या शोमध्ये बोलावलं होतं. त्यामुळे यावर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्याचे परिणाम ही माझी जबाबदारी आहे. झालेलं नुकसान आपण कसं भरून काढू शकतो, याचा विचार करताना मला रात्री झोपही लागायची नाही, असं करण जोहरने सांगितलं. वाद वाढल्यानंतर करण जोहरने हार्दिक-राहुलचा हा शो इंटरनेटवरून काढून टाकला.


पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पांड्या पुन्हा फिट होण्यासाठी प्रयत्न करत आहे. टी-२० वर्ल्ड कप ९ महिन्यांवर आल्यामुळे पांड्या टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. २६ वर्षांच्या पांड्याने २०१९ वर्ल्ड कपमध्ये भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचवण्यात बॉल आणि बॅटने महत्त्वाची भूमिका बजावली होती.


या वर्षाच्या सुरुवातीलाच १ जानेवारीला हार्दिक पांड्याने त्याची सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविचसोबत साखरपुडा केला. नताशासोबतच्या साखरपुड्याचे फोटो हार्दिकने इन्स्टाग्रामवर शेयर केले.