Bangladesh Batter In Asia Cup 2023: आशिया कप स्पर्धेमधील आपल्या दुसऱ्या सामन्यामध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत केलं. अफगाणिस्तानच्या संघाला  पहिल्या सामन्यामध्ये बांगलादेशने दिलेलं 335 धावांचं आव्हान पेलवलं नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 44.3 ओव्हरमध्ये 245 धावांवर तंबूत परतला. पहिल्या सामन्यामध्ये यजमान श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर बांगलादेशनं दमदार पुनरगामन केलं आहे. दुसऱ्या सामन्यामध्येही बांगलादेशाचा एक खेळाडू चांगलाच चमला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात नजमुल हुसैन शांतो आणि मेहदी हसन मिराज यांनी शतकं झळकावल्याने बांगलादेशला 334 धावांचा डोंगर उभारता आला. पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभवाचं तोंड पहावं लागलं असलं तरी एका खेळाडूने श्रीलंकन गोलंदाजांना धडकी भरवली. अफगाणिस्तानप्रमाणे श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात बांगलादेशच्या संघाला अपयश आलं तरी फलंदाजीमध्ये त्यांचं एक नाणं खणखणीत चमकलं. 


बांगलादेश मानला जात होता दुबळा संघ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया चषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ घोषित झाला तेव्हा तो फारच दुबळा संघ असल्याचं माननण्यात आलं. संघातून अनेक वरिष्ठ खेळाडूंना बाहेरच बसवण्यात आल्याने नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खालच्या क्रमांकावर खेळणाऱ्या मेहदी हसन मिराजला सलामीवीर म्हणून प्रमोशन मिळालं. या संधीचं सोनं करत मेहदी हसन मिराजने अशी फलंदाजी केली की बांगलादेशने धावांचा डोंगर उभा केला. 119 चेंडूंमध्ये 112 धावा करुन मेहदी हसन मिराज रिटायर हर्ट झाला. दुसरीकडे नजमुल हुसैन शांतोनेही 105 चेंडूंमध्ये 104 धावांची तुफान खेळी केली. या दोघांच्या दमदार कामगिरीमुळे बांगलादेशने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 334 धावा केल्या. नजमुल हुसैन शांतो हा पहिल्या सामन्यातही बांगलादेशसाठी हिरो ठरला. 


पहिल्या सामन्यात तो एकटाच झुंजला


आशिया चषक स्पर्धेमध्ये श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशचा जो एकमेव फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिला तो म्हणजे नजमुल हुसैन शांतो. पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना एकीकडे वेळोवेळी बांगलादेशचे फलंदाज बाद होत असतानाच दुसऱ्या बाजूला नजमुल हुसैन शांतो टिकून राहिला. त्याने 122 चेंडूंमध्ये 89 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली. केवळ 4 खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आल्याने बांगलादेशच्या संघाला 164 धावांपर्यंतच मजल मारता आली. यापैकी 89 धावा एकट्या नजमुल हुसैनच्या होत्या. श्रीलंकेनं हे आव्हान 5 गड्यांच्या मोबदल्यात 39 व्या षटकामध्येच पूर्ण केलं. मात्र अनेकांना नजमुल हुसैन शांतोची खेळी लक्षात राहिली.


14 चौकार आणि 2 षटकारांसहीत 193 धावा


नजमुल हुसैन शांतोने यजमानांविरोधात केलेल्या 89 धावा आणि अफगाणिस्तानविरोधात केलेल्या 104 धावांच्या जोरावर स्पर्धेत एकूण 193 धावा केल्या असून तो सध्याच्या घडीला (4 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच भारत नेपाळ सामन्याआधीपर्यंत) आशिया चषक 2023 स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 2 सामन्यांमध्ये 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने एकूण 193 धावा केल्या आहेत.