ढाका : क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर राजकारणाच्या आखाड्यात आजपर्यंत अनेक क्रिकेटपटू उतरले आहेत. पण बांगलादेशच्या वनडे टीमचा कर्णधार मशरफी मुर्तझानं क्रिकेट खेळतानाच खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. मुर्तझानं अवामी लीग पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. या निवडणुकीत तो अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आला. बांगलादेशमध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगनं जोरदार विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेख हसीना यांच्या पक्षाची सत्तेत यायची ही लागोपाठ तिसरी वेळ आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार मुर्तझानं नरेल-दोन या जागेवरून निवडणूक लढवली. मुर्तझाला या निवडणुकीत २,७४,४१८ मतं मिळाली. तर मुर्तझाच्या विरुद्ध उभ्या असलेल्या उमेदवाराला फक्त ८,००६ मतं मिळाली. अवामी लीगच्या नेतृत्वातल्या आघाडीला ३०० पैकी २६० ठिकाणी विजय मिळाला.


मुर्तझाचं रेकॉर्ड


बांगलादेश टीमचा ऑलराऊंडर असलेल्या मुर्तझानं २०२ वनडेच्या १४८ इनिंगमध्ये १४.०४ची सरासरी आणि ८७.८४ च्या स्ट्राईक रेटनं १,७२८ रन केले आहेत. तर बॉलिंगमध्ये त्यानं ४.८ च्या इकोनॉमी रेट आणि ३१.३६ च्या सरासरीनं २५८ विकेट घेतल्या आहेत. ५१ रन हा मुर्तझाचा वनडेतला सर्वाधिक स्कोअर आहे. तर बॉलिंगमध्ये २६ रनवर ६ विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ठ कामगिरी आहे. नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये मुर्तझानं १९.३३ च्या सरासरीनं ६ विकेट घेतल्या. या सीरिजमध्ये त्याला फक्त एकदाच बॅटिंग करायची संधी मिळाली. तेव्हा तो ६ रनवर नाबाद राहिला.


मुर्तझाच्या नेतृत्वात बांगलादेशनं नुकतंच वेस्ट इंडिजला वनडे सीरिजमध्ये २-१नं हरवलं. याचबरोबर २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये बांगलादेशचा २-०नं विजय झाला. टी-२० सीरिजमध्ये मात्र वेस्ट इंडिजनं बांगलादेशला २-१नं हरवलं.


बांगलादेशमधल्या या निकालांमुळे शेख हसीना चौथ्यावेळी पंतप्रधान बनणार आहेत. शेख हसीना यांच्या प्रतिस्पर्धी खालिदा जिया अनिश्चित काळासाठी ढाक्याच्या जेलमध्ये आहेत.