महिला खेळाडूंच्या कराराचीही बीसीसीआयकडून घोषणा, मिताली राजचं `डिमोशन`
टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या कराराची घोषणा केल्यानंतर आता बीसीसीआयने महिला टीमचा करारही घोषित केला आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या कराराची घोषणा केल्यानंतर आता बीसीसीआयने महिला टीमचा करारही घोषित केला आहे. बीसीसीआयने धोनीला करारबद्ध न केल्याची चर्चा सुरु असतानाच महिला टीमची दिग्गज खेळाडू मिताली राजचं डिमोशन करण्यात आलं आहे. मागच्यावर्षी मिताली राजने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
मिताली राज आता ग्रेड एमधून ग्रेड बीमध्ये आली आहे. बीसीसीआय आणि महिला खेळाडूंचा हा करार ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंतचा आहे. ३७ वर्षांच्या मितालीने सप्टेंबर २०१९ साली टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मिताली अजून वनडे टीमची कर्णधार आहे आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपपर्यंत ती खेळू शकते, अशी शक्यता आहे.
बीसीसीआयच्या करारानुसार ए ग्रेडमधल्या खेळाडूंना ५० लाख रुपये, बी ग्रेडच्या खेळाडूंना ३० लाख रुपये आणि सी ग्रेडच्या खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपये मिळणार आहेत.
'ए ग्रेड' मधल्या खेळाडू
हरमनप्रीत कौर, स्मृती मंधना. पूनम यादव
'बी ग्रेड' मधल्या खेळाडू
मिताली राज, झुलन गोस्वामी, एकता बिष्ट, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमीमाह रोड्रिग्ज, तानिया भाटीया
'सी ग्रेड' मधल्या खेळाडू
वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी हेमलता, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, हरलीन देओल, प्रिया पुनिया, शेफाली वर्मा
मागच्यावर्षी सी ग्रेडमध्ये असलेल्या मोना मेश्रामला यंदा करारबद्ध करण्यात आलेलं नाही. करारबद्ध खेळाडूंमध्ये ए ग्रेडमध्ये ३ खेळाडू, बी ग्रेडमध्ये ८ खेळाडू आणि सी ग्रेडमध्ये ११ असे एकूण २२ खेळाडू आहेत.