मुंबई : आयसीसी टी -20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएई (UAE)  आणि ओमानमध्ये (Oman) खेळवला जाणार आहे. टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची अद्याप घोषणा केलेली नाही, पण लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी, भारतीय टीममध्ये (Team India) कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाईल याची अटकळ सुरू झाली आहे. काही युवा खेळाडू आहेत ज्यांना टी -20 विश्वचषकात संधी मिळण्याची खात्री आहे. त्याचबरोबर असे काही दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.


सूर्यकुमारला मिळू शकते संधी 


टी -20 विश्वचषकाच्या संघात, धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) स्थान निश्चित असल्याचं मानलं जातं आहे. टी -20 विश्वचषक संघात सूर्यकुमार यादव 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मैदानात आक्रमक आणि चौफेर फलंदाजी करण्यासाठी सूर्यकुमार यादव ओळखला जातो.  त्यामुळे सूर्यकुमार यादवचा टी -20 विश्वचषक संघात प्रवेश निश्चित मानला जात आहे. सूर्यकुमारला संघात संधी मिळाल्यास श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) संघातलं स्थान धोक्यात येऊ शकतं.


वरुण चक्रवर्तीला लागणार लॉटरी?


स्पीन गोलंदाज वरुण चक्रवर्तीलाही (Varun Chakravarthy) टी-20 विश्वचषक संघात लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरुण चक्रवर्ती मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखला जातो. ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन असे विविध प्रकार वरुण चक्रवर्तीच्या भात्यात आहेत. त्यामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेत वरुण चक्रवर्ती विरोधी टीमसाठी घातक ठरू शकतो. वरुण चक्रवर्तीला संधी मिळाल्यास यजुवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) जागा धोक्यात येऊ शकते.


चेतन साकारियाला मिळणार संधी?


चेतन साकारियाला (Chetan Sakariya) टी -20 विश्वचषक संघात संधी दिली जाऊ शकते. चेतन साकरियामध्ये चेंडू दोन्ही प्रकारे स्विंग करण्याची क्षमता आहे. आयपीएल 2021 मधल्या चांगल्या कामगिरीनंतर चेतन साकारियाला भारतीय संघात स्थान मिळालं.


शिखर धवनला मिळणार डच्चू?


श्रीलंकेविरुद्धच्या टी -20 मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhavan) आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेत धवनला डच्चू मिळू शकतो. श्रीलंका दौऱ्यादरम्यान शिखर धवन टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल्डन डकचा बळी ठरणारा टीम इंडियाचा पहिला कर्णधार बनला. 3 टी -20 सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट अत्यंत सुमार होता.


शार्दुलची संघातील जागा धोक्यात


दुखापतीतून सावरल्यानंतर भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) इंग्लंडविरुद्धच्या टी -20 मालिकेत शानदार कामगिरी केली होती. तर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे शार्दुल ठाकूरचं (Shardul Thackur) टी -20 विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न केवळ स्वप्नच राहणार आहे. शार्दुल ठाकूरच्या तुलनेत भुवनेश्वरचा इकॉनॉमी रेट खूपच चांगला आहे, शिवाय शार्दुल ठाकूरच्या तुलनेत जास्त अनुभवी आहे.