हितसंबंध जपल्याच्या आरोपातून राहुल द्रविडला दिलासा
कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट...
नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला (Rahul Dravid) लाभाचं पद भूषवल्याच्या किंवा कोणत्याही प्रकारचे हितसंबंध जपल्याच्या (कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) प्रकरणात दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर जस्टिस डी.के जैन यांनी (DK Jain) द्रविडला कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट प्रकरणी क्लिन चीट दिली आहे. बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी, राहुल द्रविड विरोधातील हितसंबंधांप्रकरणी कोणतीही गोष्ट आढळली नसल्याचं सांगितलं आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डचे लोकपाल डीके जैन यांनी, 'मला द्रविडविरोधात कोणतेही हितसंबंध जपल्याचं प्रकरण आढळलं नाही. या प्रकरणातून त्याला मुक्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोन्ही पक्षांना सूचित करण्यात आलं आहे. तसेच बीसीसीआयलाही याबाबत सांगण्यात आलं असल्याचं ते म्हणाले.
मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर द्रविडला हितसंबंध जपल्याच्या प्रकरणात नोटीस पाठवण्यात आली होती. द्रविडवर हितसंबंध जपल्याचा आरोप लावण्यात आला होता. द्रविड एनसीएचा संचालक आहे. तसंच तो आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचा मालक असलेल्या इंडिया सिमेंट्स ग्रुपचा उपाध्यक्षही आहे, असं गुप्ता यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं.
या आरोपांवर बोलताना द्रविडने, मी इंडिया सिमेंट्सच्या आपल्या पदापासून दीर्घ मुदतीच्या सुट्टीवर असल्याचं सांगितलं.
आयएएनएसला आलेल्या एका पत्रात, इंडिया सिमेंटचे वरिष्ठ महाव्यवस्थापक जी. विजयन यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, द्रविडने बीसीसीआय आणि एनसीए प्रमुख म्हणून केलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेता, त्या पदावरुन दोन वर्षाची रजा घेतली असल्याचं सांगितलं आहे.